पुणे: गुलटेकडी येथील बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीला न्यायालयाने दिलासा दिला आहे. प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यासह विविध अटी शर्तींवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गांधी यांच्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
साक्षीदारांशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपर्क न साधणे, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे आणि तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणे अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.
याप्रकरणात बुधवारी (दि. २२) आरोपींच्या वकिलांसह पोलिस आणि सरकारी वकिलांनी म्हणणे सादर केले होते. गुरुवारी आदेश देताना न्यायालयाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मृत बांधकाम व्यावसायिकाने उत्कर्ष असोसिएट्स, विजय बिल्डकॉन आणि अक्षय कन्स्ट्रक्शनसाठी काम केले होते.
मात्र, धांगेकर हे संबंधित बांधकाम संस्थांचे भागीदार नसल्याचे तसेच त्यांचा मृत व्यक्तीशी थेट व्यावसायिक किंवा आर्थिक व्यवहार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही. धंगेकर यांचे नाव केवळ त्यांच्या पत्नी प्रतिभा या उत्कर्ष असोसिएट्सच्या भागीदार असल्याच्या कारणावरून प्रकरणात समाविष्ट करण्यात आले आहे.
धंगेकर हे मृत बांधकाम व्यावसायिकाला कोणतीही रक्कम देणे लागत नाही. उपलब्ध कागदपत्रे आणि प्रथम माहिती अहवालाच्या आधारे त्यांचा मृत व्यक्ती किंवा त्याच्या व्यवसायाशी थेट संबंध प्रथमदर्शनी स्पष्ट होत नसल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद करत धंगेकर दाम्पत्याला अटी शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
याप्रकरणात, धंगेकर यांतर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. तन्मय पवार आणि ॲड. श्रीनाथ लोळे यांनी सहकार्य केले. बांधकाम व्यावसायिक खलील शेख (वय ६५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यापूर्वी शेख यांनी व्हिडीओ तयार करून आर्थिक व्यवहार, थकीत रक्कम आणि कथित मानसिक छळाचे गंभीर आरोप केले होते.
याबाबत त्यांच्या पत्नी सुलताना शेख यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांची पत्नी, राजकीय पदाधिकारी बाळासाहेब शेडगे, रघुनाथ गौडा अशा बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धंगेकर दाम्पत्यासह अन्य आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.