रवी परांजपे यांच्या कलाकृतीची रसिक पुन्हा घेणार अनुभती pudhari photo
पुणे

Ravi Paranjape art exhibition : रवी परांजपे यांच्या कलाकृतीची रसिक पुन्हा घेणार अनुभती

राज्यातील संग्रहालयात प्रदर्शन : परांजपे परिवाराशी सांस्कृतिक विभागाचा करार

पुढारी वृत्तसेवा

पुणे :जगविख्यात चित्रकार रवी परांजपे यांच्या गाजलेल्या चित्र कलाकृती पाहण्याची संधी जगभरातील रसिकांना मिळणार आहे. त्यासाठी परांजपे कुटुंबिय आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे आता रवी पराजंपे यांच्या वैविध्यपूर्ण चित्र कलाकृती राज्यभरातील संग्रहालयांमध्ये पाहण्याकरिता उपलब्ध होणार असून, परांजपे यांनी साकारलेल्या 139 चित्र कलाकृतींचा त्यात समावेश आहे.

दिवंगत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले. परांजपे यांनी साकारलेल्या 72 मूळ चित्रे आणि 67 फ्रेम आर्ट वर्क अशा सुमारे 139 चित्र कलाकृती सरकारकडे सुपूर्त करण्याची इच्छा परांजपे यांच्या पत्नी स्मिता परांजपे यांनी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे 26 जून 2023 रोजी त्यांनी या कलाकृती जहांगीर आर्ट गॅलरी येथील कार्यक्रमानंतर पुरातत्त्व संचालनालयाकडे दिल्या होत्या. या कलाकृती सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या आहेत.

या कलाकृती स्वीकारण्यास आणि यासंबंधीच्या साम्यंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास सांस्कृतिक कार्य विभागाच्या 17 जून 2025 रोजीच्या सरकारी निर्णयान्वये मान्यता देण्यात आली. त्यानुसार सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी स्मिता परांजपे यांची मॉडेल कॉलनी येथील निवासस्थानी भेट घेऊन साम्यंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

शेलार म्हणाले, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या कलाकृती त्यांच्या कुटुंबियांनी सरकारकडे सुपूर्त करणे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. परांजपे यांच्या कलाकृती सरकारकडे योग्य पद्धतीने जतन करून सरकारच्या अंतर्गत विविध संग्रहालयांमध्ये नागरिकांना पाहण्याकरिता राज्यभर प्रदर्शित करण्यात येतील.

विद्यार्थ्यांना होणार फायदा

सुमारे साडे चार कोटींपेक्षा जास्त किमतीच्या या कलाकृती सध्या सातारा संग्रहालयामध्ये तात्पुरत्या स्वरूपात प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. नंतर राज्यभर या चित्र कलाकृती सरकारच्या अंतर्गत असलेल्या विविध संग्रहालयांमध्ये नागरिकांना पाहण्याकरिता प्रदर्शित करण्यात येणार आहेत. याचा फायदा संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना होणार असून, या चित्र कलाकृतींमधील मोठा भाग मुंबई येथील नियोजित राज्य वस्तुसंग्रहालयामध्ये प्रदर्शित करण्याचेही प्रस्तावित आहे.

कलेचा यथोचित सन्मान : स्मिता परांजपे

रवीजींच्या कामाचे पुढच्या पिढीला मार्गदर्शन व्हावे आणि त्यांच्या कलेचा ठेवा जतन केला जावा, या उद्देशाने हा निर्णय घेतला. सरकारने त्यांच्या कलेचा यथोचित सन्मान केल्याचे मला मोठे समाधान आहे. याची सुरुवात रवीजींच्या चित्रांपासून झाली, याचा विशेष आनंद आहे, अशी प्रतिक्रिया रवि परांजपे यांच्या पत्नी स्मिता परांजपे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT