रसिकांची उदंड गर्दी... श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या गीतांची पर्वणीच पाडव्याच्या दिवशी दै. ‘पुढारी’ने पुणेकरांना उपलब्ध करून दिल्याने रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला पहाटे 5.30 वाजेपासूनच गर्दी केली होती. 
पुणे

पुणे : सुमधुर स्वरोत्सवात रसिक चिंब

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: देव देव्हार्‍यात नाही… देवाचिये द्वारी उभा क्षणभरी… फिटे अंधाराचे जाळे… सखी मंद झाल्या तारका… तोच चंद्रमा नभात… धुंदी कळ्यांना… ओंकार स्वरूपा… अशी एकामागून एक अवीट गोडीची भाव-भक्तिगीते सुमधुर स्वरांतून सादर होत गेली आणि दिवाळी पाडव्याची मंगल पहाट उजळत गेली.

दै. 'पुढारी'ने आयोजित केलेल्या व पुणे पीपल्स बँक प्रस्तुत आणि प्रवीण-सुहाना मसाला आणि कोहिनूर ग्रुपने प्रायोजित केलेल्या 'बाबूजी आणि मी' या कार्यक्रमात अनेक अजरामर गीतांची लयलूट झाली. स्वरांमधून भावछटांचे अचूक प्रकटीकरण करणारे ज्येष्ठ गायक-संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या तसेच स्वत:च्या रचना त्यांचे सुपुत्र आणि विख्यात संगीतकार-गायक श्रीधर फडके यांनी आपल्या सहकार्‍यांच्या सहाय्याने पेश केल्या.

या कार्यक्रमाची सुरूवात पीपल्स बँकेचे अध्यक्ष अँड. सुभाष मोहिते, प्रविण सुहाना मसालाचे संचालक राजकुमार चोरडिया, पुणे कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, संचालक राजेश गोयल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. सुधीर फडके म्हणजे बाबुजींच्या गायकीचे परिपूर्ण स्वरदर्शन श्रीधरजी घडवत होतेच, पण त्याचबरोबर बाबुजींनी प्रत्येक गीताला संगीत देताना तसेच गाताना केलेला त्यामागचा खोल विचारही मांडत होते.

केवळ संगीतशास्त्रातील नियमांच्या आधारे त्यांनी रचना केल्या नाहीत, तर शास्त्र सांभाळताना ते स्वर भावनांनी ओथंबलेले कसे असतील, याचीही काळजी घेतली, हा मुद्दा मांडताना श्रीधरजींनी त्याची अनेक उदाहरणेही दिली. बाबुजींच्या रचनांप्रमाणेच त्यांनी स्वत: संगीत दिलेल्या अनेक रचनाही सादर केल्या. त्यामुळे बाबुजींचे स्वरसंस्कार त्यांच्यात कसे रूजले आहेत, याचीही साक्ष रसिकांना पटत गेली. एक गीत बाबुजींचे आणि एक गीत स्वरचित अशा क्रमाने कार्यक्रम रंगत गेला.

उत्कटतेने विरहभावना व्यक्त करणारी गीते ही तर बाबुजींची खासियतच. त्यातली तोच चंद्रमा नभात, सखी मंद झाल्या तारका या गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भक्तिगीतांतील भाव बाबुजींनी अनेक रचनांच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोचवले. देवाचिये द्वारी, कानडा राजा पंढरीचा या बाबुजींच्या भक्तिगीतांनी रसिक चिंब भिजलेच, पण श्रीधरजींच्या ओंकार स्वरूपालाही तितकीच जोरदार दाद मिळाली. त्यांच्या सांज ये गोकुळीलादेखील श्रोत्यांनी तशीच उत्स्फूर्त दाद दिली.

वन्स मोअर…
श्रीधरजींबरोबर नव्या दमाच्या गायिका शिल्पा पुणतांबेकर तसेच भाग्यश्री काजरेकर याही होत्या. समर्थ रामदास यांच्या ताने स्वर रंगवावा ही रचना पुणतांबेकर यांनी जोरदार तानांच्या सहाय्याने सादर केली. त्यावर रसिकांनी वन्स मोअरची मागणी केली आणि त्यांनी ती पुरीही केली. त्याच गीतात तबल्यावर तुषार आंग्रे आणि बासरीवर सचिन जगताप यांची जुगलबंदी अशी रंगली की प्रेक्षकांनी प्रेक्षागृह डोक्यावर घेतले. ओंकार पाटणकर यांनीही सिंथेसायझरची उत्तम साथ दिली.

प्रेक्षकांनाही गायला लावले…
श्रीधरजींनी आपल्या या सुरेल मैफलीत प्रेक्षकांनाही सहभागी करून घेत त्यांनाही गायला लावले. ओंकार स्वरूपाच्या ओळी सारे रसिक गात होते आणि त्यामुळे समूहगानाचा एक अनोखा आविष्कार घडत होता. गंगु बाजारला जाते हो जाऊ द्या या गीतावर सगळ्यांनी ठेका धरला.

दिव्या दिव्यांची ज्योत सांगते, फुलले रे क्षण माझे… एक धागा सुखाचा… का रे दुरावा… मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा… विकत घेतला श्याम… मी राधिका, मी प्रेमिका… ही सदाबहार गीतेही सादर झाली. हे भक्तजन वत्सले… या संत नामदेव महाराजांच्या अभंगाने त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली तेव्हा जवळपास सकाळचे पावणेदहा वाजले होते. अनेक तास रंगलेला हा कार्यक्रम कायमच स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया अनेक रसिकांनी कार्यक्रमानंतर व्यक्त केली.

या रंगलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'पुढारी'चे निवासी संपादक सुनील माळी यांनी केले तर पुण्याचे मार्केटिंग हेड संतोष धुमाळ यांनी आभार मानले. 'पुढारी'च्या पुणे आवृत्तीचे सर व्यवस्थापक दिलीप उरकुडे, उप सरव्यवस्थापक विजय शिरगावकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

गर्दीने प्रेक्षागृह भरून वाहिले…
'बाबुजी आणि मी' चा हा कार्यक्रम पद्मावतीच्या अण्णा भाऊ साठे सभागृहात झाला. पुणेकरांनी त्याला इतका भरभरून प्रतिसाद दिला की प्रेक्षागृहातील तळमजल्यावरील सर्व खुर्च्या तसेच बाल्कनीतीलही सर्व खुर्च्या भरल्या. एवढेच नव्हे तर अनेक रसिक जागा मिळेल तिथे उभे राहून गीतांचा आनंद लुटत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT