पुणे

Rape case : विशेष मुलीवर बलात्कार प्रकरण : ‘त्या’ वृद्धाला 10 वर्षांची शिक्षा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वयंसेवी संस्थेमध्ये मुलीवर बलात्कार करणार्‍या 60 वर्षीय केअरटेकर श्याम दिवाकर काकडे याला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास 15 दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद केले आहे. हवेली तालुक्यातील स्वयंसेवी संस्थेमध्ये जून 2016 आणि त्यापूर्वीचा काही कालावधी आणि 20 मार्च 2017 या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी संस्थेच्या महिला अध्यक्षांनी हवेली पोलिसांत फिर्याद दिली आहे.

संस्थेमध्ये केअरटेकर म्हणून काम करीत असताना काकडे याने पीडितेला कामे सांगून आणि इतर प्रकारे त्रास दिला. तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडिता गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी काम पाहिले. सात साक्षीदार तपासले. त्यामध्ये संस्थेच्या महिला अध्यक्षा, विशेष मुलींच्या शाळेचे अध्यक्ष, महिला सामाजिक कार्यकर्त्या, तपासी अंमलदार आणि ससूनच्या डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. निवृत्त पोलिस निरीक्षक कैलास पिंगळे आणि उपनिरीक्षक आर. के. वाईकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार, सत्र न्यायालय कोर्ट पैरवी अंमलदार सहायक पोलिस उपनिरीक्षक विद्याधर निचित, पैरवी कर्मचारी हवालदार सचिन अडसूळ यांनी मदत केली.

डीएनए अहवालावरून बाळ आरोपीचेच असल्याचे निष्पन्न

या प्रकारानंतर पीडितेचे लग्न झाले आहे. त्यामुळे न्यायालयात तिची साक्ष झाली नाही. मात्र, तिने बाळाला जन्म दिला आहे. डीएनए रिपोर्टवरून हे बाळ आरोपीचेच असल्याचे निष्पन्न झाले. हा पुरावा शिक्षेसाठी महत्त्वाचा ठरल्याची माहिती अ‍ॅड. वाडेकर यांनी दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT