पारगाव(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : रांजणी येथील तीन तरुणांनी सायकलवर रांजणी ते तिरुपती बालाजी, असा तब्बल 1 हजार 50 किलोमीटरचा प्रवास अवघ्या चार दिवसांत पूर्ण केला. राजेश किसन थोरात, डॉ. संजय वाघ व शरद कुंडलिक वाघ या तिघांचे परिसरातून कौतुक होत आहे. सायकलचा वापर आरोग्यासाठी चांगलाच आहे, असा संदेश हे तरुण देत आहेत. मागील शनिवारी (दि. 24 डिसेंबर) या तिघांनी रात्री दोन वाजता सायकल प्रवासाला सुरुवात केली.
पहिल्या दिवशी कारमळा (रांजणी) ते अक्कलकोट असा 335 किलोमीटरचा प्रवास केला. त्यामध्ये सुरुवातीचा भिगवणपर्यंतचा 140 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सहा तासांत पूर्ण केला. पहिल्या दिवशीचा मुक्काम अक्कलकोट येथे केला. दुसर्या दिवशी 210 किलोमीटरचा प्रवास करून कोसगी (तेलंगण) येथे मुक्काम केला. त्यानंतर तिसर्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता प्रवासाला सुरुवात केली व 291 किलोमीटरचा प्रवास करीत ते तिरुपती बालाजी येथे पोहचले.
पहिल्या दिवशी प्रवास करताना थंडी जाणवली. दुसर्या दिवशीच्या प्रवासात कर्नाटकातून उष्ण हवामान होते आणि तिसर्या दिवशी पुन्हा एकदा तेलंगणमधून प्रवास करताना थंड हवामान होते. त्यानंतर चौथ्या दिवशी आंध्र प्रदेश राज्यातून प्रवास करताना आम्हाला तीन ते चारवेळा पावसाने देखील भिजवले. अशा प्रकारे चार दिवसांच्या प्रवासात वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव त्यांना आला. सायकलमुळे स्नायूंचा व्यायाम होतो. पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते, असे राजेश थोरात यांनी सांगितले.