Shirur Crime Pudhari
पुणे

Shirur Crime: दुसऱ्या लग्नासाठी मुलाचा खून करणाऱ्या आईस अटक; भांबर्डे येथील घटना

रांजणगाव आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सागर डांगे, फॉरेन्सिक टीम यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन तपासात सहकार्य केले.

पुढारी वृत्तसेवा

शिरूर: दुसरे लग्न करण्यासाठी 11 महिन्यांचा मुलगा आड येत असल्याने त्याचा सिमेंटच्या ओट्यावर आपटून खून करीत मृतदेह बॅगमध्ये भरून विहिरीत टाकून देणाऱ्या आईला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. यश रवींद्र पवार, असे मुलाचे नाव आहे. ही घटना 8 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भांबर्डे (ता. शिरूर) येथे घडली. याबाबत रवींद्र अशोक पवार (वय 36, रा. भांबर्डे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याची पत्नी पूजा रवींद्र पवार (रा. भांबर्डे) हिला अटक केली आहे.

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी फियार्दीने दिलेल्या तक्रारीनुसार याप्रकरणी अकस्मात मयत अशी नोंद 5 एप्रिल रोजी केली होती. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादीची पत्नी पूजाची सखोल चौकशी केली. फिर्यादी यांनी देखील पूजाची विचारपूस केली.

या वेळी तिने, कोकणातील मुरुड येथून फिरून आल्यानंतर यश हा नेहमी किरकिर करून रडतो यामुळे कोठेतरी निघून जाऊन दुसरा चांगला नवरा पाहून लग्न करावे, मुलाला सोबत घेऊन गेल्यावर कोणी लग्न करणार नाही असा विचार करून यशचे डोके घरासमोरील कपडे धुण्याच्या सिमेंट ओट्यावर आपटवले.

खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी सिमेंट ओट्यावरील रक्त पाण्याने धुऊन काढले. मुलाचा मृतदेह कपड्याच्या बॅगेत भरून शेत जमीन गट नंबर 351 विहिरीजवळ आणला. बॅग पाण्यात बुडावी यासाठी बॅगमध्ये दोन दगड भरले. त्यानंतर बॅग विहिरीत टाकून दिली. त्यानुसार पूजाविरुद्ध पती रवींद्रने पोलिसांत फिर्याद दिली.

आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगावचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक निळकंठ तिडके यांनी भेट दिली. रांजणगाव आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सागर डांगे, फॉरेन्सिक टीम यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन तपासात सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT