पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे. या चित्रपटाचे अभिनेते रणदीप हुडा यांनी 2022 मध्ये रंगारी भवनाला भेट देऊन सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात आणि त्यामागील इतिहास जाणून घेतला होता. हा सर्व इतिहास त्यांच्या चित्रपटात साकारून त्यांनी युवा उद्योजक पुनीत बालन यांना दिलेला शब्द पाळला.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती अशी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची ख्याती आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या मूर्तीप्रमाणे दिसणारी हुबेहूब दुसरी मूर्ती बनवून दाखवण्यात आली आहे. तसेच, क्रांतिकारक हत्यारे, पुस्तके, पत्रे आदी गोष्टींची देवाण-घेवाण करताना स्पष्ट दिसत आहेत. यावरून स्वातंत्र्यपूर्वकाळात उत्सवाच्या माध्यमातूनही स्वातंत्र्यचळवळ कशी चालवली जात होती, याचे दर्शन प्रेक्षकांना घडवले आहे.
या चित्रपटाचे काम सुरू असताना 2022 मध्ये गणेशोत्सवादरम्यान अभिनेते रणदीप हुडा यांनी 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट' येथे भेट देऊन भवनाचा क्रांतिकारी इतिहास जाणून घेतला होता. त्या वेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी स्वतः मोबाईलमध्ये भवनाचा इतिहास छायाचित्रांच्या आणि व्हिडीओच्या माध्यमातून कैद केला होता. या बाप्पाच्या उत्सवाचा प्रसंग चित्रपटात दाखवणार असल्याचा शब्दही त्यांनी बालन यांना दिला होता.
'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट'च्या इतिहासाला एक अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटातून 'त्या' इतिहासाला उजाळा मिळाला, ही भाविकांप्रमाणेच ट्रस्टचा उत्सवप्रमुख म्हणून माझ्यासाठीही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.
– पुनीत बालन, विश्वस्त व उत्सवप्रमुख, रंगारी ट्रस्ट
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची मूर्ती ही प्रेरणादायक आहे. या मूर्तीमुळे अनेक क्रांतिकारकांना बि—टिशांविरुद्ध लढण्याची ताकद मिळाली. हा सर्व इतिहास जाणून घेतल्यानंतर ही मूर्ती चित्रपटात वापरण्याचा निर्णय घेतला.
– रणदीप हुडा, अभिनेता
हेही वाचा