इंदापूर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील उजनी धरणालगत असलेल्या भीमा नदीकाठावरील कांदलगाव, हिंगणगाव, तरटगाव भागात रानगव्याने धुमाकूळ घातला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा रानगवा या परिसरातील शेतकर्यांच्या जनावरांवर हल्ला करत आहे. शनिवारी (दि. 17) पुन्हा एकदा हिंगणगावमध्ये सतीश विक्रम खबाले या शेतकर्याच्या 80 हजार रुपये किमतीच्या म्हशीचा या रानगावच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला, तर दुसरी दुधाळ म्हैस जखमी झाली आहे.
या महिन्यात रानगाव्याने शेतकर्यांच्या जनावरांवर हल्ला करण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 4 जून रोजी कांदलगाव येथील रोहिदास दत्तू ननवरे यांची अडीच वर्षे वयाची म्हैस रानगव्याने ठार केली होती. याच वेळी बाळासाहेब ज्ञानदेव ननवरे यांच्या मोठ्या दुधाळ म्हशीलादेखील या गव्याने 10 ते 12 ठिकाणी जखमा केल्या होत्या. या घटनेला दोन आठवडे होता येत ना तोच पुन्हा एकदा हिंगणगावमध्ये युवराज पवार यांच्या गोठ्यावर सतीश खबाले यांच्या म्हशीला या रानगाव्याने हल्ल्यात ठार केले. इंदापूर वनविभाग आणि पुणे येथील रेस्क्यू टीमने या घटनास्थळी भेट दिली आहे. या रानगव्यास पकडून इतरत्र सोडण्याची परवानगी नागपूरहून येते. त्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. परवानगी मिळाल्याशिवाय या गाव्याला पकडता येणार नसल्याचे इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी यांनी सांगितले.