केडगाव : पुढारी वृत्तसेवा
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दौंड तालुक्यातून विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांची बिनविरोध निवड झाली आहे. सलग आठ वेळा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून निवडून गेलेले रमेश थोरात हे सहकारातील एकमेव नेतृत्व आहे. १३ वर्षे त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.
वयाच्या जवळपास ७० व्या वर्षांपर्यंत त्यांनी सहकारात केलेल्या उत्तम कार्यप्रणालीमुळे दौंड तालुक्यातून त्यांची बँकेसाठी आठव्यांदा झालेली निवड तरुण राजकारण्यांना मार्गदर्शन करणारी म्हणता येईल. त्यांच्या बिनविरोध निवडीची बातमी तालुक्यात समजतात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सहजपुर, कासुर्डी, यवत, भांडगाव या पुणे-सोलापूर महामार्गावरील असलेल्या गावात त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
केडगाव-चौफुला या ठिकाणी माजी आमदार आणि विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांचे बुधवारी (दि. २२) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आगमन होताच फटाक्यांच्या अतिषबाजीत स्वागत करण्यात आले. पंचायत समितीच्या सभापती हेमलता फडके, माजी सभापती मीनाताई धायगुडे यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी देवळगाव गाडा, वरवंड, बोरीपार्धी गावच्या सरपंच आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. खुटबाव या ठिकाणी त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. तालुक्यातील त्यांची निवड सहकारी संस्थांना आणि शेतकरी वर्गाला प्रेरणदायी ठरणारी आहे, असे मत राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले.