बारामती : कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेले भाजप नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांनी, रोहित पवार यांना उद्देशून केलेल्या ’भावकीचा विचार केला नसता तर तू आमदार झाला नसतास’ या वक्तव्यानंतर शिंदे यांनी तीव— नाराजी व्यक्त केली. शिंदे यांनी दावा केला की, अजित पवार यांचे हे वक्तव्य त्यांना सातत्याने टॉर्चर करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना योग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे. (Latest Pune News)
शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अजित पवार यांनी वारंवार अशा वक्तव्यांद्वारे ’शिळ्या कढीला ऊत आणण्याचा’ प्रयत्न केला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात त्यांच्या पराभवामागे पवार कुटुंबातील अघोषित करार आणि नियोजित कट होता. अजित पवारांनी महायुतीचा धर्म पाळला नाही आणि त्यांना सभेसाठी बोलावूनही ते आले नाहीत. यामुळे त्यांचा पराभव 1243 मतांनी रोहित पवार यांच्याकडून झाला. या आरोपांमुळे महायुतीत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करताना, अजित पवार यांच्या भूमिकेमुळे महायुतीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे यांचा गैरसमज झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे.