पुणे: बहीण-भावाचे नाते अधिक मजबूत धाग्यात बांधणारा रक्षाबंधनाचा हा सण आज शनिवारी (दि. 9) आनंदात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सगळीकडे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून, वैविध्यपूर्ण प्रकारच्या राख्यांसह भेटवस्तूंच्या खरेदीसाठी सणाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि. 8) बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळाली. पावसातही महिला-तरुणींनी राखी खरेदीला प्राधान्य दिले.
श्रावणातील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे रक्षाबंधन. राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचा सण संपूर्ण देशात आनंदात साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम व्यक्त करणारा हा सण शनिवारी साजरा होणार असून, सणासाठी लागणार्या वस्तूंच्या खरेदीसाठी रविवार पेठेतील बोहरी आळीसह फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता आदी ठिकाणी लगबग दिसून आली. (Latest Pune News)
कोणी कपल राखी, म्युझिकल राखी, फॅमिली राखी सेट खरेदी केले, तर काहींनी विविध डिझायनर राख्यांची खरेदी केली. तर, पोकेमॉन, मोटू पतलू, छोटा भीम अशा लहान मुलांसाठीच्या कार्टून्स राख्यांनाही पसंती मिळाली. बहिणींनी भावासाठी आणि भावांनी बहिणीसाठी कपड्यांसह घड्याळ, सोन्याच्या दागिन्यांसह भेटवस्तूंच्या खरेदीचे निमित्त साधले.
बहिणीने भावासाठी आणि भावांनी बहिणींसाठी खास संदेश असलेले भेट कार्डही खरेदी केली. शनिवारी पारंपरिक वेशभूषा परिधान करून बहिणी भावांना ओवाळून त्यांच्या हातावर राखी बांधणार आहेत.