कर्जबाजारीपणा हेच शेतकरी आत्महत्येचे कारण : शेट्टी File Photo
पुणे

कर्जबाजारीपणा हेच शेतकरी आत्महत्येचे कारण: शेट्टी

शेतकर्‍यांच्या आत्महत्येला कर्जबाजारीपणा कारणीभूत आहे. केंद्र सरकारनेच त्याची आकडेवारी दिली आहे.

पुढारी वृत्तसेवा

इंदापूर: साखर आणि दुधाला योग्य भाव मिळत नाही. राज्यातील शेतकर्‍यांना ठिबक सिंचनचे अनुदान अद्याप मिळालेल नाही. नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन पर अनुदान घोषणा करून चार वर्षे झाली तरी मिळाले नाही. याला शेतकरी जबाबदार आहेत. कारण, शेतकर्‍यांकडून प्रतिसाद मिळत नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्येला कर्जबाजारीपणा कारणीभूत आहे. केंद्र सरकारनेच त्याची आकडेवारी दिली आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

इंदापुरात न्यायालयीन कामकाजासाठी आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. शेट्टी म्हणाले, राज्यातील निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने तीन लाख पर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले. होते. त्याला उत्तर म्हणून महायुतीच्या नेत्यांनी सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. देशात सर्वाधिक थकबाकीदार शेतकरी महाराष्ट्रात आहेत. हे मोठे संकट आहे.

कांद्याच्या निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकांची वाटोळे झाले आहे. मागील वर्षी साखर निर्यात बंदी केली. त्यामुळे उसाला अपेक्षित भाव मिळाला नाही. दूध दरासाठी शेतकरी आक्रोश करतोय. सोयाबीन आणि कापसाला भाव मिळत नाही याला केवळ सरकारचे धोरण कारणीभूत आहे. हे सर्व होत असताना शेतकर्‍यांमध्ये जागृती होत नाही किंवा राग यायला पाहिजे तो येताना दिसत नाही. राज्यकर्त्यांच्या मागे पळण्यात शेतकरी धन्यता मानतात, असेही शेट्टी म्हणाले.

सोयाबीन खरेदी केंद्रावर दहा चाकी, बारा चाकी ट्रकमधून सोयाबीन आले तर त्याची खरेदी लगेच होते आणि ट्रॉलीतून किंवा बैलगाडीतून सोयाबीन आले तर त्याला आठ आठ दिवस ताटकळ ठेवलं जातं असे आमचे निरीक्षण आहे. सरकारने हमीभावाचा कायदा केला असता तर सोयाबीन हमीभावातच विकले गेले असते.हमीभावापेक्षा कमी किमतीत सोयाबीन विकले जात आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT