पुणे : संरक्षणमंत्री सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीने गुरुवारी पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास प्रतिष्ठान (एआरडीई) या संस्थेला भेट दिली, जी शस्त्रास्त्र आणि कॉम्बॅट इंजिनिअरिंग सिस्टीम्स (एसीई) क्लस्टरच्या अंतर्गत डीआरडीओची एक प्रमुख प्रयोगशाळा आहे. "केवळ तंत्रज्ञानाचे वापरकर्ते नसावे; तर निर्माते देखील असले पाहिजे. संरक्षणातील आत्मनिर्भरता हे केवळ एक ध्येय नाही, तर ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वात मजबूत ढाल आहे.''असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना संबोधीत करताना व्यक्त केले.
भेटी दरम्यान, समितीने क्लस्टरच्या विविध प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक उत्पादनांची पाहणी केली. प्रदर्शित केलेल्या उल्लेखनीय उत्पादनांमध्ये अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम, पिनाका रॉकेट सिस्टीम, लाईट टँक 'झोरावार', व्हील्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म आणि आकाश-न्यू जनरेशन मिसाईल यांचा समावेश आहे.
समितीला रोबोटिक्स, रेल गन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लाँच सिस्टीम, हाय-एनर्जी प्रोपल्शन मटेरियल इत्यादी क्षेत्रात विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या स्थितीबद्दल देखील माहिती देण्यात आली. क्लस्टरचा सविस्तर भविष्यातील रोडमॅप देखील सादर करण्यात आला. समितीच्या इतर सदस्यांनी एसीई क्लस्टरने केलेल्या कामगिरी आणि कामाबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यातील धोरण ठरवण्यासाठी महत्वपूर्ण सूचना दिल्या.