राजगुरुनगर : एखाद्या सहकारी बँकेच्या अध्यक्षाने राजीनामा दिला, तो प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केला… आणि पुढे काय? तर तो ‘हरवला’! राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालकांना जिल्हा निबंधक कार्यालयात नुकताच हा अनुभव आला आहे.
राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे यांनी संचालक मंडळाच्या ३१ जुलैच्या बैठकीत राजीनामा दिला आणि तो सोमवारी (दि. ३) जिल्हा निबंधक कार्यालयात दाखल केल्याची अधिकृत माहिती बँकेचे मुख्याधिकारी शांताराम वाकचौरे यांनी दिली.
पण शुक्रवारी (दि. ७) जिल्हा निबंधक प्रकाश जगताप यांनी थेट सांगितले की , “आमच्याकडे असा कोणताही राजीनामा अद्याप दाखल झालेला नाही.”
हा केवळ एक अपघात आहे का? की ‘अर्थपूर्ण तडजोडी’साठी मुद्दाम वेळकाढूपणा केला जात आहे? अशी चर्चा जोरात सुरू आहे.
राजगुरुनगर सहकारी बँकेच्याच बाबतीत हे पहिल्यांदा घडत नाही तर जिल्ह्यातील अशा अनेक सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये याबाबत तीव्र नाराजी आहे. “राजीनामा आला की लगेच प्रक्रिया सुरू व्हावी, पण येथे तारखा देऊन पडताळणीच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जातो. आर्थिक तडजोडीसाठीच असे प्रकार वारंवार घडतात,” अशा सहकारी संस्थांच्या संचालकांच्या तक्रारी आहेत.
उपाध्यक्ष रामदास धनवटे यांचाही राजीनामा झाला आहे. दोन्ही पदांसाठी लवकरच निवडणूक होणार, असे सांगितले जात आहे. मात्र ही निवड प्रक्रिया कधी होणार याबाबत जिल्हा निबंधक प्रकाश जगताप यांच्याकडे माहिती घेतली असता हा प्रकार उघडकीस आला आहे.
मुळात अध्यक्ष सागर पाटोळे यांचा राजीनामा जिल्हा निबंधक कार्यालयात जमा झाला की नाही? तो कुठे गेला? आणि जिल्हा निबंधक कार्यालयातून ‘पडताळणी’च्या नावाखाली चालणारी नेहमीची चालढकल खरोखर प्रशासकीय प्रक्रिया आहे की ‘तडजोडी’साठीची कूटनीती आहे? या सगळ्या आणि प्रत्येक राजीनामा वेळी सुनियोजित अशा कटकारस्थानमागे स्वतः जिल्हा निबंधक की कार्यालयातील नेमके कोण? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका ४ दिवसांत लागतात. काही महिनाभर लागत नाहीत, यामागचे गौडबंगाल काय?
पुणे जिल्ह्यातील नागरी सहकारी संस्थांमधील पदाधिकाऱ्यांना विनाकारण भुर्दंड सोसावा लागत असल्याची भावना वाढत आहे. जिल्हा निबंधक कार्यालयाने याबाबत स्पष्ट भूमिका घेणे आणि राजीनामा ‘गायब’ झाल्याचा आरोप फेटाळणे आवश्यक आहे. अन्यथा ‘प्रशासकीय गोपनीयता’ आणि ‘तडजोडी’ यांच्या सीमेवर उभ्या असलेल्या या प्रकरणात विश्वासार्हतेचा प्रश्न उभा राहणार आहे.
दरम्यान, राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक अरुण थिगळे तर उपाध्यक्षपदासाठी समीर आहेर आणि सचिन मांजरे यांची नावे चर्चेत आहेत. पुढील वर्षी बँकेची निवडणूक होणार असल्याने सध्याचे पदाधिकारी हे पंचवार्षिक काळातील अखेरचे असण्याची शक्यता आहे.
राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या राजीनामा बाबत मला विचारणा करणे चुकीचे आहे.असा कोणताही प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडे अद्याप आलेला नाही.
- प्रकाश जगताप, जिल्हा निबंधक, सहकारी संस्था, पुणे
संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष सागर पाटोळे यांनी पदाचा राजीनामा दिला. सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानंतर सोमवारी (दि ३) जिल्हा निबंधक कार्यालयात तो दाखल करण्यात आला आहे.
- शांताराम वाकचौरे, मुख्याधिकारी, राजगुरुनगर सहकारी बँक.