वेल्हे : तब्बल तीन महिन्यांनंतर हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड मंगळवारी (दि. 20) विजेच्या प्रकाशाने उजाळला.
जोरदार पाऊस व वादळी वार्यामुळे जून महिन्यापासून राजगडावरील वीजपुरवठा खंडित झाला होता, याकडे स्थानिक मावळा जवान संघटनेने महावीज वितरणचे लक्ष वेधले होते. राजगडावर तीन महिन्यांनंतर वीजपुरवठा सुरू झाल्याने गडावरील शिवकालीन पद्मावती मंदिर विजेच्या प्रकाशाने उजळले. गडावरील पर्यटक निवास, रामेश्वर मंदिर व पाहरेकरी निवास येथील वीज सुरू झाली आहे.
वीजपुरवठा सुरू झाल्याने पर्यटकांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच पद्मावती देवीच्या नवरात्र उत्सवात सहभागी होणार्या भाविकांची सोय होणार आहे. महावितरण कंपनीचे वेल्हे विभागाचे शाखा अभियंता संतोष शिंदे यांच्या देखरेखीखाली महावितरणचे कर्मचार्यांनी अतिदुर्गम भागातील झाडाच्या फांद्या, झुडपे काढली. पुरातत्व खात्याचे राजगडाचे पाहरेकरी बापू साबळे, सुरक्षारक्षक आकाश कचरे व विशाल पिलावरे यांनीही परिश्रम घेतले.