वेल्हे : सध्या दोन आठवड्यांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने राजगड, हवेलीसह मोसे-मुठा खोऱ्यातील काढणीला आलेल्या तसेच कापणी केलेल्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साठल्याने भाताच्या दाण्यांना कोंब फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. (Latest Pune News)
सिंहगड, पानशेत, राजगड भागात बहुतेक लवकर कापणीस येणाऱ्या हळव्या, इंद्रायणी, गुजरात, इंडम आदी जातीची भातपिके घेतली जातात. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पिके कापणीस आली होती. मात्र, अवकाळी पावसाने ही पिके धोक्यात आली. हा अवकाळी पाऊस घाटमाथ्यासह लगतच्या डोंगरी पट्ट्यात पडत आहे. ओढे-नाल्यातून पाणी वाहत आहे. भातखाचरे, भातशेतीत पाणी साठले आहे. कापणी केलेल्या भातपिकांना कोंब फुटले आहेत, तर उभी पिके जमीनदोस्त होऊन पाण्यात कुजत आहेत. त्यामुळे भातपिकांच्या कापणीचे कामही ठप्प पडले आहे.
यंदा चांगला पाऊस पडल्याने भाताचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता होती. मात्र, भाताच्या कापणीच्या दिवसांतच दोन आठवड्यापासून पावसामुळे पिके वाया गेली आहेत. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
पिवळं सोनं मातीमोल
या भागात दसऱ्याच्या सणापासून दररोज पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. त्यातच आठवड्यापासून रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह राजगड तालुका, मोसे, मुठा खोऱ्यासह सिंहगड, हवेलीत दररोज अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे कुठे भाताच्या दाण्यांना कोंब फुटले आहेत, तर कुठे बुरशी लागली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचं पिवळं सोनं मातीमोल झालं आहे.
पिवळं सोनं मातीमोल
या भागात दसऱ्याच्या सणापासून दररोज पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. त्यातच आठवड्यापासून रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह राजगड तालुका, मोसे, मुठा खोऱ्यासह सिंहगड, हवेलीत दररोज अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे कुठे भाताच्या दाण्यांना कोंब फुटले आहेत, तर कुठे बुरशी लागली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचं पिवळं सोनं मातीमोल झालं आहे.
सरसकट भरपाई द्यावी
गडकोटांच्या परिसरातील मावळी शेतकऱ्यांचे भात हे एकमेव वर्षभराच्या उत्पन्नाचे साधन आहे. अद्यापही पाऊस पडत आहे. त्यामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली, तर कापणी केलेली पिके वाया गेलीत. येथील निम्म्याहून अधिक पिके वाया जाणार आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी केली आहे.
राजगड तालुक्यातील भात पिकांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश कृषी, पंचायत व महसूल विभागाला देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन समक्ष पाहणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.निवास ढाणे, तहसीलदार, राजगड