दत्ताजी नलावडे
पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 मध्ये बांधलेल्या आणि जगभरातील डोंगरी किल्ल्यांत उत्कृष्ट स्थापत्य शैलीचा जिवंत ठेवा असलेल्या व हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्याला युनोस्कोने जागतिक वारसास्थळा जाहीर केले आहे, त्यामुळे गडावर देशविदेशातील पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. राजगडाच्या अभेद्य, सुरक्षा तटबंदी, सांस्कृतिक इतिहास, शिवरायांच्या लष्करी रणनीतीचा अभ्यास, माहिती देश-विदेशातील पर्यटकांना मिळणार आहे.
सह्याद्रीच्या अतिदुर्गम डोंगरकड्यावर शिवरायांनी राजगडाची उभारणी केली. गडाच्या एका बाजूने गुंजवणी व दुसर्या बाजूने वेळवंडी नदी वाहत आहे. चोहोबाजूंना सह्याद्रीच्या डोंगररांगा, पश्चिमेला अतिविशाल तोरणागड असल्याने भौगोलिक दृष्ट्या गडाला दुर्गमता प्राप्त झाली आहे. गडाच्या तीन बाजूंना सुवेळा माची, पद्मावती माची व संजीवनी माची अशा तीन माची व मध्यभागी अतिदुर्गम बालेकिल्ला आहे. (Latest Pune News)
राजगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 ते 1672 अशी तब्बल 25 वर्षे हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला. या काळात राजपरिवारासह गडावर त्यांचे वास्तव्य होते. गडावर शिवरायांची राजसदर, राजवाडा, राजमाता जिजाऊ यांचे निवासस्थान, राणीमहल, सेनापती, मुलकी, लष्करी विभागप्रमुख, मंत्र्यांची निवासस्थाने, सैन्याच्या पाहरे, चौक्या आदी वास्तू होत्या. पद्मावतीदेवी मंदिर व इतर देवतांची मंदिरे होती. सध्या पद्मावतीदेवी मंदिर व इतर दोन-तीन मंदिरे आहेत. ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष आहेत.
गडाच्या पायथ्याशी पाल बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वसवलेल्या शिवपट्टण शहराचे अवशेष सापडले तसेच गडावरील उत्खननात काळाच्या ओघात लुप्त झालेल्या शिवरायांच्या राजसदरेखालील गुप्त तळघर, भव्य तटबंदी, सुरक्षा, टेहळणी चौक्या आदी वास्तू सापडल्या आहेत.
राजगडाच्या सभोवतालचे दुर्गम डोंगर आणि दर्जेदार बांधकामाचे अवशेष, शिवरायांच्या यशस्वी स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाहून युनोस्कोची समिती भारावून गेली होती. या किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांत समावेश झाल्याने छत्रपती शिवरायांच्या विश्ववंदनीय मानवकल्याणकारी कार्याचा व राष्ट्रीय बाण्याचा ज्वलंत इतिहास जगभरात पोहचणार आहे.
जागतिक वारसास्थळांचा दर्जा मिळाल्याने राजगड किल्ल्यावर विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येणार आहेत. त्यामुळे युनोस्कोच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत, त्यासाठी आता नियमितपणे देखभाल दुरुस्तीसह आवश्यक निधीची तरतूद करावी लागणार आहे. देशविदेशातील पर्यटकांमुळे गडकोट व परिसरात पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असून, स्थानिकांना गाईड, हॉटेल आदीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच स्थानिक ग्रामीण हस्तकला, कारागिरी, वस्तू, खाद्यपदार्थ आदींना जागतिक बाजारपेठही उपलब्ध होणार आहे.- डॉ. विलास वाहणे, पुरातत्व विभागाचे सहसंचालक