पुणे : अलीकडेच विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला 'छावा' रिलीज झाला आहे. या सिनेमात एका सीनबाबत शिर्के घराण्याचे वंशज दीपक राजे शिर्के यांनी आक्षेप घेतला आहे. या सिनेमातील काही सीनवर आक्षेप नोंदवताना ते म्हणाले, " चित्रपटातून आमच्या घराण्याची बदनामी करण्यात आली आहे. यामुळे समाजात आमच्या घराण्याविषयी समाजात बदनामी झाली. या चित्रपटातून इतिहासात तोडफोड करुन समाजात तेढ निर्माण केली जात आहे. आम्ही या करिता छावा कादंबरीच्या लेखक, प्रकाशकासह सेन्सॉर बोर्डाला नोटीस पाठवली आहे. तसेच, राज्यभर याबाबत आंदोलन उभारणार आहे. चित्रपटातील या सीनबाबत दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांना नोटीस पाठवली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, उत्तेकरांनी खूप सुंदर चित्रपट बनवला आहे. चित्रपट चांगला आहे, मात्र त्यातील खलनायक चुकीचा दाखवला. त्यात त्यांनी राजेशिर्के घराण्याची बदनामी करणारा चुकीचा कंटेंट दाखवला आहे. यामुळे राजेशिर्के परिवाराची बदनामी होते आहे दिग्दर्शक उत्तेकरांनी सिनेमातील आक्षेपार्ह कंटेंट डिलीट करावेत. अन्यथा आमच्या सर्व राजघराण्यातील नातेवाईक एकत्र येऊन आंदोलन करू
या सिनेमात राजेशिर्के परिवाराची प्रतिमा अत्यंत चुकीची दाखवली आहे. छावा कादंबरी काल्पनिक आहे. आज कादंबरी हाच इतिहास समजला जातो. आगामी काळात चित्रपट हा देखील इतिहास समाजाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजेशिर्के स्वराज्यनिष्ठ होते. खरा इतिहास शासनाने शोधावा, त्यासाठी पथके नेमावीत. तसेच चित्रपटातील आक्षेपार्ह इतिहास काढून आमची माफी मागावी. अशी मागणी दीपक राजे शिर्के यांनी यावेळी केली.