निमोणे; पुढारी वृत्तसेवा : रामोशी समाजाच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांची मला जाण आहे, राजे उमाजी नाईक यांच्या जन्मदिनी मी जाहीर सभेत आर्थिक विकास महामंडळाचा समाजाला शब्द दिला आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व तांत्रिक मुद्दे निकाली काढून आगामी काही महिन्यातच राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन होईल अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व रामोशी समाजाचे नेते दौलतनाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नुकतीच मंंत्रालयात फडणवीस यांची भेट घेतली.
या वेळी शितोळे यांनी रामोशी समाजाच्या वतनी जमिनी धनदांडग्यांनी अन्यायी पध्दतीने लुबडल्या असून काही ठिकाणी वेळेवर शेतसारा भरला नाही म्हणून सरकारनेच जमिनी ताब्यात घेतल्या आहेत, हे फडणवीसांच्या निदर्शनास आणून दिले तसेच राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्यात आपण समाजाला शब्द दिला होता की, रामोशी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू, आर्थिक विकास महामंडळ व वतनी जमिनीसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिले असून पुढील काही महिन्यात रामोशी समाजाच्या जीवनात अभूतपूर्व परिवर्तन घडून येणारा निर्णय होईल, असा अशावाद रामोशी समाजाचे नेते दौलत शितोळे यांनी व्यक्त केला.