आळंदी: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा घुंडरे घराण्याला मिळाला आहे. घुंडरे घराण्याची बैलजोडी माऊलींचा पालखी रथ ओढणार आहे. विवेक ज्ञानेश्वर घुंडरे, जनार्दन घुंडरे, अर्जुनराव मारुती घुंडरे आणि सचिन बाळासाहेब घुंडरे हे यंदाच्या माउलींच्या पालखी सोहळ्यातील बैलजोडीचे मानकरी ठरले आहेत.
विवेक घुंडरे यांनी बावधन (जि. सातारा) येथून राजा-प्रधान ही बैलजोडी बाळासाहेब कदम यांच्याकडून सहा लाख रुपयांना खरेदी केली आहे. तसेच दुसरी बैलजोडी सावकार व संग्राम ही हिंजवडी येथून उमेश साखरे यांच्याकडून पाच लाख रुपयांना खरेदी केली आहे. (Latest Pune News)
अर्जुनराव मारुती घुंडरे व सचिन बाळासाहेब घुंडरे यांनी नांदेड सिटी, पुणे येथून 5 लाख 51 हजार रुपयांना मल्हार व आमदार ही बैलजोडी निखिल कोरडे यांच्याकडून खरेदी केली, तसेच दुसरी बैलजोडी माऊली व शंभू ही उत्तमनगर येथून मुरलीधर नाणेकर यांच्याकडून 2 लाख 51 हजार रुपयांना खरेदी केला आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यासाठी बैलांकडून शेती मशागत, बैलगाडी ओढणे असा सराव केला जात आहे. या बैलांसाठी खुराक म्हणून शाळूची वैरण, हिरवा चारा, पेंड, खारीक-खोबर्याचा भुगा, बैलखाद्य मिक्स आदी देत आहेत.
आळंदी येथे आज मिरवणूक
बैलजोडीची सोमवारी(दि. 2) आळंदी शहरात भव्य मिरवणूक व पूजन होणार आहे. जास्तीत जास्त आळंदीकर, तसेच भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मानकरी घुंडरे यांनी केले आहे.