कार्हाटी : रब्बी हंगामाला उपयुक्त पाऊस झाल्याने कार्हाटी (ता.बारामती) परिसरात शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. शेतकरी पशुधन वाचवण्यासाठी चारा पिके घेण्यावर भर देत आहेत. बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील कार्हाटी, राटी, पानसरेवाडी, माळवाडी, फोंडवाडा, जळगाव सुपे, जळगाव कप, भिलारवाडी देऊळगाव रसाळ आदी भागात गुरुवारी (दि.21) दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपून काढले. रब्बी हंगामातील ज्वारी, मका, कडवळ पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे शेतकरी शिवाजी वाबळे यांनी सांगितले. विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी मात्र अजून दमदार पावसाची गरज असल्याचे मत कार्हाटीचे शेतकरी राहुल पवार यांनी व्यक्त केले.