पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी चक्रीवादळात रूपांतर होत आहे. मात्र, त्याचा परिणाम महाराष्ट्रावर फारसा होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, राज्यातील कमी दाबाचे पट्टे कमी झाल्याने सोमवार व मंगळवारी काही भागांत पाऊस होईल. पण, त्यानंतर राज्याचे तापमान 4 ते 5 अंशांनी वाढणार आहे.
रविवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अंदमानसह बंगालच्या उपसागरातील बेटांवर जोरदार पाऊस सुरू झाला. दक्षिण किनारपट्ट्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात दिसत असून, पुणे शहरात रविवारी पहाटे जोरदार पाऊस झाला.
दोन दिवस या भागात पाऊस
सोमवार व मंगळवारी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यांतच ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रावर अवकाळी पावसासाठी घोंघावणारी वारा-खंडितता प्रणाली संपुष्टात आली असून, बुधवार (दि. 10) पासून संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण पूर्णपणे स्वच्छ होण्याची शक्यता आहे.
– माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ