पुणे

राहू : रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकरच; सहजपूर येथे 34 कोटी रुपयांचा निधी मंजूर

अमृता चौगुले

राहू (ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यामध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सहजपूर-नांदूर येथील औद्योगिक वसाहतीकडे जात असलेल्या रेल्वेवरील उड्डाणपुलासाठीच्या कामाला अखेर सुरुवात होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून 34 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, नुकतेच या कामासाठी रेल्वेचे प्रादेशिक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एस. शिंदे, तहसीलदार संजय पाटील, सरपंच मीनाक्षी म्हेत्रे, उपसरपंच रोहित म्हेत्रे, तसेच स्थानिक पदाधिकारी यांनी स्थळाची पाहणी केली.

सहजपूर (ता. दौंड) येथे रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाची उभारणी करावी अशी मागणी या परिसरातील प्रवासी वर्गाकडून सातत्याने करण्यात येत होती. पुणे शहराच्या लगतचा ग्रामीण भाग असलेला सहजपूर-नांदूर औद्योगिक पट्टा हा सध्या जोमाने विकसित होत आहे. शेजारूनच पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग तसेच रेल्वे महामार्ग व इतरही भौतिक सुविधा असल्यामुळे अनेक नवीन गुंतवणूकदार या ठिकाणी गुंतवणूक करण्यास इच्छुक होते; मात्र उड्डाणपुलाअभावी सातत्याने वाहतुक कोंडी होत होती.

पुणे शहराकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून खामगाव, नांदूर, सहजपुर, दहिटणे, राहू, मिरवडी, देवकरवाडी या परिसरातील अनेक लोक सोलापूर महामार्गाकडे जाण्यासाठी या रस्त्याचा सातत्याने वापर करतात तसेच या परिसरातील शाळकरी मुले, शेती उत्पादन, तरकारी माल याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते.

सहजपूर येथील रेल्वे मार्गावर उड्डाण पूल नसल्यामुळे तसेच या रस्त्यावरून वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे वाहतुक कोंडी सातत्याने होते. या रस्त्यावर नवीन उड्डाणपूल हवा अशी मागणी अनेक वर्षापासून प्रवासी व नागरिकांमधून करण्यात येत होती.दरम्यान सकाळी सुरू झालेला हा पाहणी दौरा सायंकाळपर्यंत करण्यात आला. दरम्यान, या कामाची पाहणी सहजपूर येथील रेल्वेगेट येथून सुरू करण्यात आली होती.

सहजपूर येथे 34 कोटींच्या रेल्वे उड्डाणपुलाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. यामुळे या भागामध्ये नवनवीन उद्योग येण्यास मदत होईल.

                                                           – दिलीप म्हेत्रे, उद्योजक, सहजपूर

सहजपूर येथील रेल्वे उड्डाणपुल कामाला सुरुवात होणार असुन रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यायी वाहतुक व्यवस्थेबाबतही आढावा घेण्यात आला.

                                                     – संजय पाटील, तहसीलदार, दौंड

सहजपूर-नांदूर औद्यगिक पट्ट्यामध्ये वाहतुक कोंडीवर पर्याय म्हणुन आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातुन 34 कोटी निधी मिळाला आहे.

                                                      – माऊली म्हेत्रे, स्थानिक नागरिक

खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये अनेकदा प्रश्न उपस्थित करत पत्रव्यवहार केल्यामुळे या उड्डाणपुलासाठी निधी मिळाला.
                                                        – विशाल म्हेत्रे, स्थानिक नागरिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT