पुणे: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अस्थिरोग (ऑर्थोपेडिक्स) विभागाच्या द्वितीय वर्षातील तीन निवासी डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले आहे.
पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रथम वर्षात असलेल्या निवासी डॉक्टरवर द्वितीय वर्षातील तीन निवासी डॉक्टरांनी रॅगिंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. निवासी डॉक्टरच्या आईने याबाबत महाविद्यालय प्रशासनाकडे सोमवारी तक्रार केली होती. (Latest Pune News)
तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडेही (एनएमसी) ऑनलाइन पद्धतीने तक्रार करण्यात आली आहे. मंत्रालयासह वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांकडेही तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तक्रारदार हे शैक्षणिक संस्थेशी निगडित आहेत.
ससून रुग्णालयाशी संलग्नित बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिरोग विभागात हा प्रकार घडला आहे. तक्रारदार निवासी डॉक्टरांबरोबर अजून एका निवासी डॉक्टरावर रॅगिंग करण्यात आल्याचा दावा तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्या निवासी डॉक्टरने याबाबत कुठलीही तक्रार दिली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार 28 एप्रिल रोदी दुपारी रॅगिंगबाबतची तक्रार प्रशासनाला प्राप्त झाली. त्यानुसार तातडीने चौकशी सुरू करण्यात आली.
तक्रारदारासह आरोप करण्यात आलेल्या निवासी डॉक्टरांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. तसेच लिखित स्वरूपात खुलासा मागितला असल्याचे पवार यांनी सांगितले. रॅगिंग प्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशी समितीला सात दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर करावा लागतो. त्यानुसार येत्या सोमवारपर्यंत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे.
डॉ. गिरीश बारटक्के यांची उचलबांगडी
रॅगिंगच्या प्रकरणानंतर तातडीने डॉ. गिरीश बारटक्के यांच्याकडून पदव्युत्तर अधिष्ठाता आणि अस्थिरोग विभागप्रमुख पदाचा कारभार काढून टाकण्यात आला आहे. पदव्युत्तर अधिष्ठातापदी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अस्थिरोग विभाग प्रमुखपदी डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, डॉ. शिंत्रे सध्या रजेवर असल्याने डॉ. राहुल पुराणिक यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.
वसतिगृहातील खोलीही सोडण्याचे आदेश
निलंबित करण्यात आलेल्या निवासी डॉक्टरांना वसतिगृह खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तक्रारदारासह आरोप करण्यात आलेले निवासी डॉक्टर उच्चभ्रू घरातील आहे. परिणामी, चौकशी समितीवर दोन्ही बाजूंनी दबाव येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाने या संपूर्ण प्रकारावर मौन बाळगले आहे.