सासवड : पुढारी वृत्तसेवा : फायनान्स कंपनीचा वसुली एजंट असल्याची बतावणी करून अनेक गाडी मालकांकडून लाखो रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी टिनु जगताप (रा. ताथेवाडी, ता. पुरंदर) व बोराडे (पूर्ण नाव माहीत नाही. रा. गराडे, ता. पुरंदर) यांच्यावर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या नेतृत्वाखाली सासवड पोलिसांनी या टोळीच्या कारनाम्यांचा पर्दाफाश केला आहे.
विशाल नेटके (रा. खानवडी, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. विशाल नेटके हे छोटा टेम्पो चालवून उदरनिर्वाह करीत असतात.सासवडच्या जेजुरी नाक्यावर त्यांची गाडी टिनू जगताप आणि साथीदाराने अडवून टाटा फायनान्स कंपनीतून आल्याचे सांगत त्यांचा एक हप्ता थकीत असल्याने गाडी जमा करा, असे सांगितले. त्यावर नेटके यांनी गयावया करताच त्यांना धमकावून किमान 8 हजार रुपये भर असे सांगितले. नेटके यांनी गुगल पे वर पाठवतो, असे सांगितल्यावर कॅशच द्या, असे जगतापने सांगितले.
अखेर नेटके यांनी 5 हजार रुपये देऊन आपली सोडवणूक केली. मात्र, कंपनी किमान 3 हप्ते थकल्याशिवाय गाडी उचलत नाही हे लक्षात आल्याने नेटके यांनी टाटा फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीकडे चौकशी करून आपली गाडी उचलण्याचे आदेश आहेत का विचारले. मात्र, असे आदेश नाहीत आणि टिनू जगताप हे कंपनीचे एजंटदेखील नाहीत अशी धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. दुसर्या दिवशी सासवडच्या भाजी बाजारात नेटके यांना गाठून जगताप याने पुन्हा धमकावले आणि मारहाण केली.
त्यामुळे नेटके यांनी सासवड पोलिसात याबाबत खंडणी आणि अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. ही मुले वसुली एजंट नसताना अनेक वर्षे तालुक्यात अशा स्वरूपाची वाटमारी करीत असल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे करीत आहेत.
आणखी तक्रारी असल्यास संपर्क साधा : शिवतारे
दरम्यान, याबाबत माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले, या टोळीने सासवडसह संपूर्ण पुरंदर तालुक्यात हैदोस घातला आहे. आरोपी कुठल्याही कंपनीचे वसुली एजंट नसल्याचे सर्व कंपन्यांनी सांगितले आहे. अशाप्रकारे त्यांनी आणखी कुणाकडून पैसे उकळले असल्यास तत्काळ माझ्या कार्यालयाशी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्याशी संपर्क साधावा.