राज्यात रब्बी पिकांची उच्चांकी; 64.83 लाख हेक्टरवर पेरा Pudhari
पुणे

राज्यात रब्बी पिकांची उच्चांकी; 64.83 लाख हेक्टरवर पेरा

एकूण 120 टक्के पेरण्या पूर्ण, हरभरा क्षेत्र29 लाख हेक्टरवर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्यांखालील सरासरी क्षेत्र 53 लाख 97 हजार हेक्टरइतके आहे. तर कृषी विभागाच्या पीक पेरणीच्या अंतिम अहवालानुसार यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी म्हणजे 64 लाख 83 हजार 391 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 120 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. राज्यात पाण्याची उपलब्धता अधिक असल्यामुळे पेरणी क्षेत्र वाढण्यास मदत झाल्याचे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले.

त्यामध्ये हरभरा पिकाखालील सरासरी क्षेत्र 21.52 लाख हेक्टरहून वाढून तब्बल 29 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. तसेच गहू आणि मक्याच्या पेरणी क्षेत्रातही भरीव वाढ झाली आहे. मात्र, सरासरी 17.53 लाख हेक्टरइतके क्षेत्र असताना ज्वारीच्या पेरण्या 15.46 लाख हेक्टरवर (88 टक्के) पूर्ण झाल्या आहेत.

गव्हाचे क्षेत्र 10.48 लाख हेक्टरइतके असून 13.08 लाख हेक्टरवर (125 टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर मका पिकाखाली 2.58 लाख हेक्टर क्षेत्र असून प्रत्यक्षात 4.84 लाख हेक्टरवर (187 टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. म्हणजेच शेतकर्‍यांचा कल ज्वारी पिकाऐवजी हरभरा आणि गहू पिकाकडे वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यात रब्बी हंगाम 2023-24 मध्ये 58.60 लाख हेक्टरवर पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. चालूवर्ष 2024-25 च्या रब्बी हंगामअखेर त्यामध्ये भरीव वाढ होऊन पेरण्या 64.83 लाख हेक्टरवर पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजेच यंदा सरासरी क्षेत्रापेक्षा 10.86 लाख हेक्टरने पेरण्यांखालील क्षेत्रात वाढ झालेली आहे. तर गतवर्षीपेक्षा यंदा 6.23 लाख हेक्टरने पिकांखालील क्षेत्रात वाढ झाल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली.

रब्बी हंगामात शेतकर्‍यांकडून पाणी उपलब्धता असल्यामुळे बागायती पीक घेण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामध्येही गहू, मक्याची पेरणी वाढली आहे. कमी पाण्यावर येणारे हरभरा पीक आता रब्बी हंगामातील मुख्य पीक ठरल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. कारण रब्बीत पेरणी झालेल्या 64.83 लाख हेक्टरपैकी 29 लाख हेक्टर म्हणजे जवळपास 45 टक्के वाटा हरभरा पिकाचा आहे. यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्यांखालील क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली. त्यामुळे यंदा उत्पादनातही निश्चित अशी वाढ अपेक्षित आहे.
- वैभव तांबे, मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT