खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा खेड-शिवापूर फाट्यावर सुरू असलेल्या कामामुळे तसेच कासुर्डी फाट्यावर व खेड-शिवापूर फाट्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणे-सातारा महामार्गावर खेड-शिवापूर ते शिंदेवाडी अशी सुमारे पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र सकाळच्या वेळी दिसून आले. यामुळे प्रवाशांना व पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
रविवारी सुट्टी असल्याने पुणे शहरासह जिल्ह्यातील नागरिक कोकण, महाबळेश्वर, पाचगणी येथे पर्यटनाला जाण्यासाठी बाहेर पडले होते. त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासूनच खेड शिवापूर फाटा ते खेड शिवापूर बाग व पुढे शिंदेवाडी अशा सुमारे पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान खेड-शिवापूर फाट्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे कोंढणपूर फाट्यावरील उड्डाणपूल संपला की पुढील वाहतूक सेवा रस्त्याने वळविली आहे. त्या ठिकाणी मोठया प्रमाणात खड्डे पडले असल्याने व गतीरोधक अरुंद रस्ता असल्याने वाहनांच्या रांगा वाढत जाऊन त्या पाच ते सहा किलोमीटर पर्यंत पोहोचल्या होत्या. यामुळे पर्यटकांना हे अंतर पार करण्यासाठी तब्बल एक तास वाट पाहावी लागत होती.
दरम्यान आठवड्यातून तीन दिवस या भागात वाहतूक कोंडी होत असते. यामुळे या उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी आता पर्यटकांकडूनही होत आहे.
वारंवार याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. सबंधित ठेकेदारास अनेकवेळा सांगूनही येथील खड्डे बुजविण्याबाबत उदासीनता दिसत आहे असे महामार्ग पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :