Question of 3rd-4th Railway Local Route
तिसर्‍या-चौथ्या रेल्वे लोकल मार्गिकेचा प्रश्न मार्गी Pudhari
पुणे

‘पुणे-लोणावळा’साठी राज्याचा निम्मा खर्च

पुढारी वृत्तसेवा

बहुप्रतीक्षित पुणे-लोणावळा तिसर्‍या-चौथ्या रेल्वे लोकल मार्गिकेचा निम्मा खर्च राज्य सरकार करणार असून, या संदर्भातील प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सही केली आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल सेवेचा प्रश्न मार्गी लागला आहे.

गेली काही वर्षांपासून पुणे- लोणावळा मार्गिका तयार करण्यासंदर्भातील प्रस्ताव रखडला आहे. सुरुवातीला ही मार्गिका तयार करण्यासाठी रेल्वे प्रशासन निम्मा खर्च, राज्यशासन 25 टक्के आणि उर्वरित 25 टक्के खर्च पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासनाने करावे, असे ठरले होते. मात्र, दोन्ही महापालिकांनी या प्रकल्पासाठी निधी देण्यास नाकारले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र आणि राज्यसरकारच्या भागीदारीतील प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे सांगितले होते. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आता राज्य सरकार या प्रकल्पातील खर्चाचा निम्मा वाटा उचलणार असल्याचे समजत असून, मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या प्रस्तावावर सही केल्याचे देखील समजत आहे. यामुळे पुणे- मुंबईदरम्यान होणारी रेल्वे गाड्यांची कोंडी कमी होणार असून रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

पुणे-लोणावळा तिसर्‍या-चौथ्या मार्गिकेचे काम मार्गी लागावे, यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे. या प्रकल्पाचा निम्मा खर्च राज्यसरकार करणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांनी याबाबतच्या प्रस्तावावर दोन दिवसांपूर्वीच सही केली आहे.
- मुरलीधर मोहोळ, खासदार व केंद्रीय हवाई राज्यमंत्र
SCROLL FOR NEXT