रियाज सय्यद :
भवानीनगर : उदमाईवाडी (ता. इंदापूर) येथील प्रदीप घाडगे हे डाळिंबबागेत वेदर स्टेशन हे यंत्र बसवून हवामानाचा योग्य वेळी अचूक अंदाज घेत आहेत. परिणामी, वेळेत सर्व उपचार करून डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले आहेत.
घाडगे यांनी दोन एकरात डाळिंबाची लागवड केली आहे. शेतातील त्यांच्या आधुनिक हवामान यंत्रणेचा अभ्यास करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्यांनी बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या डाळिंबबागेला नुकतीच भेट दिली. घाडगे हे डाळिंब तज्ज्ञ नीलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डाळिंबाचे उत्पादन घेतात.
या यंत्राला तीन सेन्सर असून, दोन सेन्सर जमिनीत व एक हवेत लावले आहे. हवेतील सेन्सरमुळे बागेत आर्द्रतेचे प्रमाण किती आहे आणि त्यामुळे झाडांच्या पानांवर कोणते रोग येतील, याचा अंदाज येतो. जमिनीतील सेन्सरमुळे जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण समजते. एवढेच नव्हे तर हे यंत्र 24 तासांमध्ये पाऊस येणार असल्यास तो किती येईल? संभाव्य रोगांपासून बचावासाठी औषधाची फवारणी घ्यायची का नाही? याचीही माहिती देते. त्यानुसार नियोजन करता येते. हे यंत्र मोबाईलला जोडलेले असून, प्रत्येक तासाला बागेतील परिस्थितीचा संदेश पाठवते.
दर्जेदार फळांसह उत्पादनातही वाढ
आधुनिक यंत्राचा वापर केल्यामुळे डाळिंबाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. दोन एकरात डाळिंबाचे पहिल्या वर्षी साडेसात टन उत्पादन मिळाले. यामधून आठ लाख रुपये मिळाले. झाडांचा आकार वाढत गेल्यानंतर उत्पन्नही वाढते. डाळिंबाची लागवड केल्यापासून दहा ते पंधरा वर्षांपर्यंत बागेत उत्पादन घेता येते. शेतमालाचे कोसळणारे दर व खते आणि औषधांचा वाढता खर्च लक्षात घेता शेतकर्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन घाडगे यांनी केले आहे.
यंत्राचे होणारे फायदे
विनाकारण औषध फवारण्याचा खर्च होत नाही.
कोणत्या रोगासाठी वातावरण निर्माण झाले आहे, याची तत्काळ माहिती.
रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वीच फवारणी करता येते.
झाडांना आवश्यकतेनुसारच पाणी देता येते.
वेदर स्टेशन यंत्रामुळे हवामानाची अचूक माहिती मिळते. डाळिंबाच्या बागेत एखाद्या रोगाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या वेदर स्टेशनच्या माध्यमातून मोबाईलवर संदेश मिळतो. त्यानुसार कोणत्या औषधाची फवारणी करायची याची माहितीही मिळते.
प्रदीप घाडगे, प्रगतशील डाळिंब उत्पादक, उदमाईवाडी