Pune PWD Office Akhad Party
पुणे: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते वेगवेगळ्या कार्यक्रमांत व्यग्र असतानाच आता सरकारी अधिकारीही अशाच कार्यक्रमांत सहभागी होत असल्याचं चित्र समोर आलं आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षिण शाखेने कार्यालयीन वेळेत सर्किट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या ‘आखाड पार्टी’मुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
कामकाज ठप्प, नागरिक हवालदिल
दुपारी १ ते ४ या वेळेत कार्यालय बंदच असल्यासारखे वातावरण होते. अधिकारी आणि कर्मचारी सर्किट हाऊसमध्ये जेवणावळीत सहभागी असल्याने कार्यालयात खुर्च्या रिकाम्या, टेलिफोन प्रतिसादाशिवाय आणि कामकाज पूर्णतः ठप्प होते. यामुळे अनेक नागरिकांना आवश्यक कामांसाठी हेलपाटे घालावे लागले. (Latest Pune News)
कार्यक्रमाचं नेतृत्व वरिष्ठ महिला अभियंत्यांकडून
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाचे नेतृत्व विभागाच्या महिला कार्यकारी अभियंता यांनी केले.या कार्यक्रमामुळे कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम झाला असून, ‘सरकारी वेळ, सरकारी संसाधनांचा वापर खासगी स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी योग्य आहे का?’ हा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रतिक्रिया नाही, चौकशीची मागणी
या संदर्भात विभागाच्या कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.दरम्यान, या घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे