पुणे

पुरंदरला गुंतवणूकदारांचे विमान जमिनीवरच!

अमृता चौगुले

दिगंबर दराडे

पुणे : श्री छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा पुरंदरला होताच पुणे, मुंबई येथील गुंतवणूकदारांनी पुरंदर तालुक्यात जमिनी घेण्यासाठी उड्या घेतल्या. घोषणेला सहा वर्षे पूर्ण झाली, तरी अजून विमानतळ तांत्रिक अडचणीत असल्याने गुंतवणूकदारांचे विमान अद्याप जमिनीवर असल्याचे वास्तव समोर आले आहे.

शिवसेना-भाजप युती सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये पुण्यासाठी पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. यानंतर पुरंदर तालुक्यात गुंतवणूक करण्यासाठी पुणे, मुंबई येथील गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या. यामध्ये राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे. आजी-माजी नेत्यांनी विमानतळाचा फायदा घेण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, अद्याप विमानतळ जुन्या जागी की नवीन जागी?

हा तिढा न सुटल्याने गुंतवणूकदारांच्या हाती काहीच पडलेले नाही. विमानतळ चाकणला होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात शेकडो एकर जमिनीवर गुंतवणूक करण्यात आली. मात्र, विमानतळाची जागा बदलल्याने येथे गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या हाती निराशाच आल्याचे पाहायला मिळाले होते. आता पुरंदरला काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फडणवीस यांच्या विमानतळाच्या घोषणेनंतर पुरंदरमधील जमिनींचा भाव वाढला. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये पुरंदर तालुक्यातून मुद्रांक शुल्कापोटी सुमारे 25 कोटी 69 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये मुद्रांक शुल्कापोटी 112 कोटी 73 लाख रुपये, 2019-20 आणि 2020-21 या दोन्ही आर्थिक वर्षांमध्येही पुरंदर तालुक्यातील खरेदी-विक्री व्यवहारांमधून 115 कोटींच्या आसपास उत्पन्न मिळाले आहे. 20-22 मध्ये देखील शंभर कोटींपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. आता जमिनीचे दर स्थिरावले आहेत. विमानतळ झाले तर या जमिनीला सोन्याचा दर मिळणार आहे.

रेडिरेकनरचा फायदा होणार का?
रेडिरेकनरचा दर वाढल्यानंतर या ठिकाणी शेतकर्‍यांना मिळणारा मोबदला अधिकचा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रेडिरेकनरची वाढ होत असताना पुरंदरला नेमकी किती वाढ मिळणार? याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.

अपेक्षित भूसंपादन क्षेत्र
पारगाव मेमाणे : 1037, उदाची वाडी 261, मुंजवडी 143, एखतपूर 271, खानवडी 484, कुंभारवळण 351, वनपुरी 339. एकूण 2,832 हेक्टर इतके आहे. या क्षेत्राभोवती अनेकांनी गुंतवणूक केली आहे.

SCROLL FOR NEXT