सासवड: पुरंदर तालुक्यात पावसाअभावी शेतकरी आणि नागरिक चिंतेत असताना, महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत पाठविण्यात येणाऱ्या संदेशांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध आणि नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाने या प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शविला आहे.
नुकतेच प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सासवड येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता भालचंद्र गवई यांना निवेदन दिले.
स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तत्काळ स्थगित करावे, तसेच ग्राहकांच्या संमतीशिवाय किंवा जबरदस्तीने मीटर बसविणे थांबवावे, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा महावितरणविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
महावितरणकडून अनेक ग्राहकांना पुढील ४८ तासांत स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्याचे संदेश पाठविले जात आहेत. मात्र, या प्रक्रियेत ग्राहकांची पूर्वसंमती घेतली जात नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
त्यामुळे आधीच दुष्काळ, पाणीटंचाई आणि आर्थिक अडचणींनी त्रस्त असलेल्या जनतेमध्ये नाराजी वाढत असल्याचे सांगण्यात आले. प्रहारचे पुरंदर तालुका संपर्कप्रमुख काशिनाथ जगताप यांनी ग्राहकांनी आपल्या कायदेशीर अधिकारांची जाणीव ठेवून स्मार्ट मीटर बसविणाऱ्या कर्मचाऱ्यांना विरोध करावा, असे आवाहन केले.
दरम्यान, नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रशासनाने पारदर्शक भूमिका घ्यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
या वेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, तालुकाध्यक्ष फिरोज पठाण, विभागप्रमुख हनुमंत नेटके, सासवड शहराध्यक्ष दत्ता दगडे, जेजुरी शहराध्यक्ष प्रमोद थोरात, माजीद इनामदार, सोहेल इनामदार आदी उपस्थित होते.