बेलसर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : सध्या कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मात्र, पुरंदर तालुक्यातील शेतकर्यांनी मोठे धाडस करून त्यांचा कांदा विक्रीसाठी थेट तमिळनाडूमधील मदुराई येथील बाजारपेठेत पाठविला आहे. रब्बी हंगामामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये जवळपास 4255.5 हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली होती. कांद्याचे उत्पन्नही विक्रमी मिळाले, परंतु बाजारभाव कोसळल्याने शेतकरी पुरते आर्थिक अडचणीत सापडले. व्यापारी शेतकर्यांकडून कांदा जागेवर प्रतिकिलोस 6 ते 7 रुपये देत खरेदी करीत आहेत. मात्र, हा दर शेतकर्यांना खूप कमी आहे. त्यांचा उत्पादन खर्चही यातून निघणार नाही. चाळीत कांदा ठेवून तो खराब होण्यापेक्षा बाजारात विकलेला बरा, या विचाराने शेतकरी मिळेल त्या बाजारभावात मिळेल त्या पद्धतीने विक्रीसाठी पाठवत आहेत. काही शेतकर्यांनी जादा दर मिळण्याच्या अपेक्षेने आपला कांदा बाहेरील राज्यात पाठवण्यास सुरुवात केली आहे.
तालुक्यातील बेलसर, धालेवाडी, रानमळा, वनपुरी, उदाचीवाडी, जेजुरी, नाझरे, खळद, गोटेमाळ येथून अतुल कुदळे (रा. रानमळा) हे कांदा खरेदी करीत आहेत. रोज जवळपास 40 टनांचा एक ट्रक कांदा तमिळनाडूतील मदुराई बाजारपेठेत पाठवत आहेत. एका ट्रकमध्ये जवळपास 700 पिशव्या कांदा पाठविला जात आहे. तीन दिवसांत पुरंदर ते मदुराई प्रवास करून कांदा बाजारपेठेत पोहोचत आहे.
एका बाजूला अवकाळी पाऊस, तर तर दुसरीकडे कवडीमोल बाजारभाव यांमुळे शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. सरकारने कांदा पिकासाठी अनुदान दिले असले, तरीदेखील शेतकर्यांना हमीभावाची अपेक्षा आहे. हमीभाव मिळाल्याशिवाय शेतकरी
सुखी होणार नाही, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
रासायनिक खतामुळे कांदा साठवणीस अयोग्य शेतकर्यांनी रासायनिक खतांचा भरमसाट वापर केल्यामुळे कांदा जास्त काळ टिकत नाही. वखार व चाळी करूनदेखील कांदा लवकर खराब होतो. त्यामुळे लवकर बाजारात पाठवण्याचा निर्णय शेतकरी घेत असताना दिसत आहेत.