पुणे: पुरंदर तालुक्यात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला आता प्रत्यक्षात गती मिळाली असून, भूसंपादनाच्या मोबदल्याचे वाटप गुरुवार (दि. 7 मे) पासून सुरू करण्यात आले.
या प्रक्रियेतील पहिला धनादेश उदाचीवाडी येथील शेतकरी विलास कुंभारकर यांना प्रदान करण्यात आला. प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुरंदर विमानतळ प्रकल्प हा पुणे जिल्ह्यासाठी महत्त्वाकांक्षी मानला जात असून, या प्रकल्पामुळे परिसरातील औद्योगिक, व्यावसायिक तसेच रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जमिनींचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष मोबदला वितरणाला प्रारंभ झाल्याने प्रकल्पाच्या कामकाजाला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उदाचीवाडी येथे आयोजित कार्यक्रमात शेतकरी विलास कुंभारकर यांना पहिला धनादेश सुपूर्त करण्यात आला. या वेळी भूसंपादन अधिकारी कल्याण पांढरे, प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी आणि ग््राामस्थ उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने मोबदला वितरित केला जाणार असल्याची ग्वाही दिली.
प्रशासनाकडून संबंधित शेतकऱ्यांची कागदपत्रे, सातबारा उतारे तसेच मालकी हक्काची पडताळणी पूर्ण करण्यात येत असून, टप्प्याटप्प्याने इतर शेतकऱ्यांनाही धनादेशांचे वितरण करण्यात येणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वीच भूसंपादन प्रक्रियेस संमती दर्शविली असून, मोबदल्याच्या रकमेसह विकसित भूखंड देण्याच्या निर्णयामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, विमानतळ प्रकल्पामुळे पुरंदर तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. रस्ते, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन परिसराचा आर्थिक चेहरामोहरा बदलणार असल्याचे मतही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.