सासवड: पुरंदर तालुक्यातील 9 रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाने 114 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जागतिक स्तरावरील पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी हे रस्ते विकसित केले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून, विविध कंपन्यांच्या सीएसआर निधीतून या स्पर्धेचा खर्च केला जाणार आहे अशी माहिती पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी दिली. (Latest Pune News)
शिवतारे म्हणाले, या निधीतून या रस्त्यांचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण केले जाईल. ही कामे तातडीने सुरू करण्याबाबत राज्य शासनाने आदेश दिले आहेत. या स्पर्धेमुळे पुण्याच्या विकासाला चांगल्या प्रकारे चालना मिळणार आहे. पावसाळा संपला की, तत्काळ या कामांना सुरुवात होणार आहे.
मंजूर कामांचा तपशील पुढीलप्रमाणे : काळदरी भोंगवली फाटा रस्ता (9.5 किमी) - 14.30 कोटी, भोंगवली - माहूर - परिंचे रस्ता (7.2 किमी) - 10.86 कोटी, परिंचे - हरणी रस्ता (6.4 किमी) - 11.33 कोटी, राऊतवाडी - हरणी - वाल्हा - वागदरवाडी रस्ता व सारोळा - वीर - मांडकी - जेऊर रस्ता (6.4 किमी) - 11.33 कोटी, येवलेवाडी कमान ते बोपदेव माची (5.5 किमी) - 3 कोटी, बोपदेव माची ते चांबळी रस्ता (9.3 किमी) - 9.05 कोटी, चांबळी ते नारायणपूर रस्ता (7 किमी) - 10.50 कोटी, रानवारा हॉटेल नारायणपूर ते कापूरहोळ रस्ता (12.8 किमी) - 13.96 कोटी, पानवडी ते सासवड रस्ता (9.90 किमी) - 14.91 कोटी, काळदरी ते पानवडी रस्ता (9.90 कोटी) - 14.96 कोटी .