शंकर कवडे
पुणे : 'अगर इरादे हो बुलंद, तो मंझिले है आसान', या उक्तीचा प्रत्यय पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील शेतकर्यांनी आणून दिला आहे. अथक परिश्रमाला तीव्र इच्छाशक्तीची जोड देऊन त्यांनी अंजीर, सीताफळ, पेरू आणि जांभूळ या फळांची शुगर फ्री पेस्ट बनवली अन् आपले हे अनोखे उत्पादन त्यांनी सातासमुद्रापार पाठवले. विशेष म्हणजे त्यांच्या या उत्पादनाला जीआय (भौगोलिक मानक) मानांकन मिळाल्यामुळे जगातील तब्बल 160 देशांच्या बाजारपेठा सताड उघड्या झाल्या आहेत.
अंजीर फळ नाशवंत आहे. प्रवासात त्याचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ते आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचणे शक्य नव्हते. परिणामी अंजिराची गुणवत्ता टिकविण्यासाठी संशोधन करून पुरंदरच्या शेतकर्यांनी दिवे जाधववाडी येथे अंजीर आणि सीताफळ शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. त्यानंतर कंपनीमार्फतच ही उत्पादने देश अन् विदेशातील बाजारांत उपलब्ध करून देण्यात आली.
दहा टन अंजिरांपासून तीन टन ब्रेड स्प्रेड…
सुरुवातीला 82 अंजीर उत्पादक शेतकर्यांकडून 10 टन अंजीर खरेदी करून ते उणे 25 अंश सेल्सिअसमध्ये ठेवण्यात आले. या अंजिरावर प्रक्रिया करून ते ब्रेड स्प्रेड विविध हॉटेल्स, कूक, गृहिणी यांना चवीसाठी दिले. आलेल्या प्रतिसादानंतर अंतिम उत्पादन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत दहा टन अंजिरापासून 3 टन ब्रेड स्प्रेडचे उत्पादन घेण्यास सुरुवात झाली.
कृषिक्षेत्रात वेगळी क्रांती…
उत्पादन ते प्रक्रिया, अशा विविध पातळ्यांवर काम करीत देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर अंजीर, सीताफळ व पेरूची उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. अंजिराबाबतीत भौगोलिक निर्देशांकानंतर शेतकर्यांनी विशिष्ट पारदर्शक पनेटमध्ये पॅकेजिंग करून अंजिराचे ब्रँडिंग केले. शेतीमालावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी एकत्र आलेल्या शेतकर्यांनी लाल पेरूचा व जांभूळ स्प्रेड (पेस्ट) बाजारात आणला आणि कृषिक्षेत्रात क्रांती घडवून आणली.