पुरंदरचे सीताफळ दिल्ली, गोव्यातील बाजारपेठेत Pudhari
पुणे

Purandar Custard Apples: पुरंदरचे सीताफळ दिल्ली, गोव्यातील बाजारपेठेत

तालुक्यातून बाजारपेठांकडे दर्जेदार फळे रवाना; गुणवत्तेनुसार दर 300 ते 2,000 रुपये कॅरेट

पुढारी वृत्तसेवा

दिवे: पुरंदर तालुक्यात सीताफळ हंगामास सुरुवात झाली आहे. देशभरात प्रसिद्ध असलेले पुरंदरचे सीताफळ थेट दिल्ली, मुंबई, गोवा अशा प्रमुख बाजारपेठांमध्ये रवाना होत आहे. तालुक्यात सुमारे 3,500 हेक्टर क्षेत्रावर सीताफळाची लागवड झाली असून, सध्या उन्हाळी हंगाम सुरू आहे. यंदा फळधारणा तुलनेत कमी असली, तरी दर्जेदार उत्पादनामुळे बाजारात मागणी चांगली आहे, अशी माहिती उप कृषी अधिकारी गणेश जगताप यांनी दिली.

शेतमालाची प्रतवारीनुसार किमती 300 रुपये ते 2,000 रुपये प्रतिकॅरेटपर्यंत मिळत आहेत. काही उच्च प्रतीचा माल दिल्ली, मुंबई, गोवा यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये जातो तसेच एक्स्पोर्टसाठीही मागणी आहे, अशी माहिती व्यापारी तुषार झेंडे, नितीन काळे, सौरभ झेंडे आणि महेश काळे यांनी दिली. (Latest Pune News)

नवीन रोजगार संधी

दिवे परिसरातील काही युवक सीताफळाचा गर काढून कोल्ड स्टोअरेजमध्ये साठवणूक करीत असून, त्याची विक्री मागणीनुसार करीत आहेत. या उपक्रमातून महिलांना व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

सुविधांच्या अभावामुळे अडचणी

सासवड येथील ही मोठी बाजारपेठ अजूनही उघड्यावर भरते. पावसाळ्यात यामुळे शेतकर्‍यांचे हाल होतात. सुसज्ज निवाराशेड, शीतगृह व प्रतवारी केंद्र उभारल्यास शेतमालाच्या योग्य व्यवस्थापनाला चालना मिळेल आणि सीताफळ उत्पादक शेतकर्‍यांना ’अच्छे दिन’ पाहायला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

काळजी घ्या!

सध्या वातावरण ढगाळ असून, अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे सीताफळ काळे पडण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांनी वेळेवर योग्य औषध फवारणी करावी, असे आवाहन कृषी सेवा केंद्राचे संचालक मुरलीधर झेंडे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT