पुणे: सीताफळासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने यंदा पंधरा दिवस अगोदरच हंगाम सुरू झाला आहे. परिणामी, गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात सीताफळे दिसू लागली आहेत. पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथून 21 किलो सीताफळांची आवक झाली. घाऊक बाजारात त्याच्या किलोला 251 रुपये भाव मिळाला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश घुले यांच्या जय शारदा गजानन या गाळ्यावर ही आवक झाली. काळेवाडी येथील शेतकरी दादा काळे यांच्या शेतातून ही सीताफळे बाजारात दाखल झाली. त्याची सुबोध झेंडे यांनी खरेदी केली. (Latest Pune News)
आंब्याचा हंगाम संपत आल्यानंतर नागरिक आवर्जून सीताफळांची वाट पाहात असतात. हवेली, पुरंदर, शिरूर तालुक्यासह अहिल्यानगर, सातारा जिल्ह्यातून आवक होत असते. सध्या दाखल झालेल्या सीताफळाला घरगुती ग्राहकांकडून मागणी आहे.
मात्र, अलीकडच्या काळात ज्यूस विक्रेते, पल्पसह विविध प्रक्रिया उद्योगांकडून मागणी वाढली आहे. आवक वाढून भाव कमी झाल्यानंतर त्यांच्याकडून खरेदी करण्यात येईल, अशी माहिती सीताफळांचे व्यापारी माऊली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर यांनी दिली.
यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने उत्पन्न चांगले होणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत सीताफळांचा हंगाम सुरू राहणार आहे. सीताफळाचे तीन बहर असतात. त्यापैकी पहिल्या बहराची ही आवक आहे. हळूहळू आवक वाढणार आहे. सीताफळासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने तीनही बहरात चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.- दादा काळे, शेतकरी, काळेवाडी, पुरंदर.