पुणे: पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी 62 टक्क्यांहून अधिक जमिनीची संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहेत. यामध्ये मुंजवडी गावातील सुमारे 90 टक्के शेतकर्यांनी संमतीपत्रे दिल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी आणि खानवडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन होणार आहे. जिल्हा प्रशासनाने 26 ऑगस्टपासून संमतीपत्रे स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. मुंजवडी गावातील सुमारे 76 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून, आतापर्यंत 70 हेक्टर क्षेत्रासाठी शेतकर्यांनी संमतीपत्रे दिली आहेत. संमतीपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत 18 सप्टेंबरपर्यंत आहे, अशी माहिती डुडी यांनी दिली. (Latest Pune News)
गेल्या 15 दिवसांत सुरू असलेल्या प्रक्रियेत सात गावांमधील तब्बल 1 हजार 600 शेतकर्यांनी आतापर्यंत 1 हजार 750 एकर क्षेत्रासाठी संमती दिली आहे. विमानतळासाठी एकूण सुमारे 3 हजार एकर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार असून, त्यापैकी 1 हजार 750 एकर क्षेत्रासाठी प्रशासनाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या एकूण क्षेत्रापैकी 62 टक्क्यांहून अधिक शेतकर्यांनी संमतीपत्रे सादर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकूण संपादन क्षेत्र : सुमारे तीन हजार एकर
संमतीपत्र दिलेले क्षेत्र : सुमारे 1750 एकर
मुंजवडीतील 90 टक्के शेतकर्यांची संमतीपत्रे