पुणे : पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी अंदाजे पाच हजार कोटी रुपये लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. सात गावांतील तीन हजार एकर भूसंपादन करण्यात येणार आहे. जमिनीचा मोबदला वाढवून मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी असून, शुक्रवारी (दि. 31 ऑक्टोबर) डुडी यांनी शेतकऱ्यांशी याबाबत चर्चा केली.(Latest Pune News)
मोबदला वाढवून मिळावा, एरोसिटीमध्ये दहा टक्क्यांऐवजी अधिक जागा मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी या वेळी केली. नवी मुंबई येथे शेतकऱ्यांना 22.5 टक्के जागा मिळाली. मात्र, तेथे भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते. पुरंदर येथील सात गावांतील शेतकऱ्यांना जमिनीसाठी दराची चौपट रक्कम, त्यांच्या जमिनीच्या दहा टक्के जागा देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले.
डुडी म्हणाले की, शेतकऱ्यांची मागणी आम्ही राज्य सरकारला कळवू. मोबदला किती द्यावयाचा, ते राज्य सरकार ठरविणार आहे. वाटाघाटीची पहिली बैठक झाली. आणखी दोन बैठका होतील. जमिनीची मोजणी झाली आहे. त्याबाबत नक्की किती जमिनीचे संपादन करावयाचे आहे, त्याचा प्रस्ताव येत्या आठवड्यात राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे.
विमानतळासाठी तीन हजार एकर भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी सुमारे 50 हेक्टर जमीन ताब्यात देण्यास अद्याप संमती मिळालेली नाही. सर्व जमिनीची मोजणी झाली आहे. त्याव्यतिरिक्त 240 हेक्टर जमीन देण्याची तयारी शेतकऱ्यांनी दाखविली आहे. त्या जमिनीचीही मोजणी करण्यात येत आहे.
भूसंपादनाची प्रक्रिया जानेवारी-फेबुवारीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे मोबदला देण्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू करावे लागेल. विमानतळाचे प्रत्यक्ष बांधकाम उन्हाळ्यामध्ये एप्रिल-मे 2026 मध्ये सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.