पुणे

पुरंदर विमानतळ विकसन हेतू प्रस्ताव सादर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बहुउद्देशीय माल वाहतूक व साठवण केंद्राच्या जागेबाबतचा विकसन हेतू प्रस्ताव तयार करून उच्चाधिकार समितीकडे पाठविण्यात आला आहे. त्याला नोव्हेंबर अखेरपर्यंत मान्यता मिळणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयीसी) संबंधित जागेच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण केली आहे.

विमानतळाबरोबर बहुद्देशीय माल वाहतूक व साठवण केंद्र (मल्टिमॉडेल लॉजिस्टिक हब) प्रस्तावित केले आहे. जमिनीचे पुनर्मूल्यांकन करून व्यावसायिक आणि औद्योगिकदृष्ट्या विकसन हेतू प्रयोजनार्थदेखील ही जागा सर्वोत्तम असल्याच्या प्रस्तावाला उच्चाधिकार समितीची नोव्हेंबरपर्यंत मान्यता मिळणार आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि जिल्हा प्रशासनाने विमानतळ प्रकल्पाबाबत आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल एमआयडीसीकडे सुपूर्त केला आहे. गेल्या अडीच वर्षांत काहीच हालचाली न झाल्याने प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या जमिनीचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत विभागीय आयुक्त राव म्हणाले, की उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाल्यानंतर तातडीने अधिसूचना काढून जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेचा एक भाग म्हणून बाधितांशी संवाद साधण्यात येणार आहे. स्थानिकांच्या सूचना हरकती, मोबदल्याचे पर्याय समजावून सांगणे या प्रक्रियेला सुरुवात होईल.

राव म्हणाले, की उच्चाधिकार समितीकडून 30 नोव्हेंबरपर्यंत मान्यता मिळेल. उच्चाधिकार समिती आणि एमआयडीसी सचिव यांची पुढील आठवड्यात राज्याच्या प्रधान सचिवांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर अधिसूचना काढण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासन स्तरावर प्रत्यक्षात कार्यवाहीला सुरुवात होईल.

एमआयडीसी आणि जिल्हा प्रशासनाने पुरंदर येथील प्रकल्प होणार्‍या सात गावांचे सर्वेक्षण करून तेथील बागायती-जिरायती जमीन, फळझाडे, विहिरी, नैसर्गिक-खासगी स्त्रोत, बाधित क्षेत्र, गटनिहाय सर्वेक्षण क्रमांक, क्षेत्रफळ, बाधितांची संख्या, त्यांची वयोमानानुसार गटवारी आणि प्रतवारी अशी सविस्तर माहिती संकलित करून अहवाल तयार केला आहे.

तातडीने अधिग्रहण करावे : फडणवीस
पुरंदर विमानतळासंदर्भात तालुक्यातील परवानगी प्राप्त जागा निश्चित करुन तातडीने त्याचे अधिग्रहण करावे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (एमएडीसी) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्यामार्फत संयुक्तिकरित्या विमानतळांचा विकास करावा. पुरंदर विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने तातडीने जागेचे अधिग्रहण करावे सुरु करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्यातील विविध विमानतळांच्या कामकाजासंदर्भात गुरुवारी मुंबईमध्ये एमएडीसी, उद्योग व नगरविकास विभागांच्या अधिकार्‍यांसमवेत बैठकीत फडणवीस बोलत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT