Purandar Aerocity to boost regional development
दिगंबर दराडे
पुणे: पुरंदरची ’एरोसिटी’ डेव्हलपमेंट चेंजर म्हणून ओळखली जाणार आहे. दिल्लीच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन देणार्या शेतकर्यांना नियोजित ’एरोसिटी’मध्ये विकसित भूखंड मिळणार आहेत. दिल्लीला एरोसिटीमुळे नावलौकिक मिळाला आहे. याच धर्तीवर पुरंदरच्या विमानतळाजवळ ही ’एरोसिटी’ उभारण्यात येणार आहे.
सातशे एकर क्षेत्रावर उभारण्यात येणारी एरोसिटी पुरंदर शहरालगत उभारण्याचा प्रशासनाने संकल्प केला आहे; जेणेकरून पुरंदर शहरातील मार्केट या परिसरात राहणार्या नागरिकांना सोयीचे पडणार आहे. प्रामुख्याने पंचतारांकित हॉटेलसह वेअरहाऊस, बंगलो यासह विविध सुविधांवर या एरोसिटीमध्ये सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. (Latest Pune News)
प्रामुख्याने जमीन स्वेच्छेने देणार्या मालकांना दिलेल्या क्षेत्रफळाच्या 10 टक्के क्षेत्रफळाचे विकसित भूखंड दिले जातील. याशिवाय बाजारभावाच्या चौपट रोख मोबदला दिला जाईल.या योजनेसाठी 700 एकर जमीन एरोसिटीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. यामध्ये प्रथम येणार्या शेतकर्यांना प्राधान्य देण्यात येईल.
लवकर संमतीपत्र देणार्यांना प्रथम भूखंड वाटप करण्यात येणार आहेत. ही विकसित एरोसिटी विमानतळाला लागून सुरू होईल. त्यामध्ये निवासी व व्यावसायिक सुविधा उपलब्ध असतील. स्वेच्छेने संमती दिल्यासच भूखंड परत मिळेल. संमती न दिल्यास केवळ चौपट रोख मोबदला मिळेल. पण, कोणताही भूखंड दिला जाणार नाही. पुणे जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयात किंवा सासवडमधील उपविभागीय कार्यालयात स्वेच्छा संमतीपत्र सादर करता येईल.
दृष्टिक्षेपात
भूखंड वाटपाच्या वेळी ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ तत्त्व लागू होईल. भूसंपादनासाठी कायदा 2019 लागू केला जाईल. एकूण सुमारे 2,674 हेक्टर जमीन सात गावांमधून घेतली जाणार आहे.
पुरंदर शहराच्या अगदी जवळ आणि विमानतळाला लागून अशी एरोसिटी असल्यामुळे परिसरातील नागरिकांना रोजगार व सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.