पुणे: एसटीचा प्रवास असो, विमानाचा असो किंवा रेल्वेचा प्रवास असो, तेथील स्थानकांवर गेल्यावर प्रवाशांना मार्गदर्शक सूचना लिहिलेल्या पाट्या लावल्याचे दिसते. त्या सुचनांनुसार प्रवासी स्थानकावरून प्रवासी वाहनांत बसून प्रवास करतात.
मात्र, पुणे मेट्रोने प्रवास करणार्या प्रवाशांना खास पुणेरी पध्दतीच्या पाट्यांच्या माध्यमातून खोचक, पुणेरी टोमणे असलेल्या मार्गदर्शक सूचना मिळणार आहेत. महामेट्रो प्रशासनाने पुण्यातील काही मेट्रो स्थानकावर अशा पाट्या लावल्या आहेत. या पाट्या मेट्रो स्थानकावरून ये-जा करणारे प्रवासी आवर्जून थांबून पहात आहेत.
अशा आहेत पुणेरी पाट्या...
मेट्रो सुटली असेल तर उगाच पळापळ करू नका. मेट्रो सुटली तरी जग थांबत नाही, पुढची मेट्रो येणारच आहे.
ऐका..! उगाच मोठ्याने गाणी लावून संगीतप्रेम दाखवू नका, पुण्यात सगळेच दर्दी आहेत, हेडफोन्स वापरा...
मेट्रोचे दरवाजे अॅटोमॅटिक आहेत, उगाच शक्ती प्रदर्शन केल्याने उघड बंद होणार नाहीत.