पुणे : खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने पुणे शहरात पाणीकपात करण्यात येणार नाही. धरणसाठ्यात तीन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कमी असतानाही, जलसंपदा विभागाच्या काटेकोर नियोजनामुळे शेतीच्या सिंचनासाठी आणखी महिनाभर उन्हाळी आवर्तन सुरू राहणार आहे. पुणे शहरासाठी 15 जुलैपर्यंतचे पिण्याचे पाणी आरक्षित करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकर सुखावणार आहेत.
खडकवासला साखळीतील चारही धरणांत बुधवारी (दि. 28) 12.74 टीएमसी (43.71 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. पुणे शहराचा दैनंदिन पाणी वापर सरासरी 1460 दशलक्ष लिटर (एमएलडी) आहे. याप्रमाणे 15 जुलैपर्यंत पुणे शहराला 6.27 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. जुलैअखेरपर्यंत सात टीएमसी पाणी लागेल. पुणे शहरासाठी लागणारे 6.27 टीएमसी पाणी धरणांत आरक्षित ठेवले आहे. पुढील दोन महिन्यांत धरणांतील सुमारे एक टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. उर्वरित पाच टीएमसी पाणी सिंचनासाठी वापरण्यात येईल.
उन्हाळी पिकांसाठी कालव्यातून पाणी देण्यास चार मार्चपासून सुरुवात झाली. आत्तापर्यंत सुमारे पावणेदोन टीएमसी पाणी देण्यात आले. पुढील महिनाभरात आणखी सुमारे अडीच ते तीन टीएमसी पाणी पिकांसाठी देण्यात येईल. सलग दोन महिने शेतीला, तसेच ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी देण्यात येत आहे. काही कालावधीनंतर पुन्हा ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या पावसाळ्यात धरणांत पाणीसाठा कमी जमा झाला होता. 15 ऑक्टोबरचा पाणीसाठा लक्षात घेऊन पुढील वर्षभराचे पाणीवाटप ठरविले जाते. खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुर्हाडे यांनी हे आव्हान पेलले. खरीप हंगामातही त्यांनी धाडस दाखवत शेतकर्यांना जादा पाणी दिले. त्यानंतर धरणे भरल्याने त्यांचा निर्णय योग्य ठरला होता. धरणसाखळीत तीन टीएमसी पाणी कमी असताना सर्वांना पुरेसे पाणी पुरविणे हे खरोखरच मोठे आव्हान होते. जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी ते पेलले.
श्वेता कुर्हाडे यांनी रब्बी हंगामातही कालव्यातून पाणी सोडताना त्याचे प्रमाण आणि वेगावर नियंत्रण ठेवले. त्यामुळे पाण्याची बचत झाली, तसेच शेतीलाही पुरेसे पाणी मिळाले. त्यांच्या नियोजनाला पुणे महापालिकेचीही साथ मिळाली. मार्चमध्ये आजपर्यंत महापालिकेने रोज सरासरी 1385 एमएलडी पाणी घेतले. मार्चसारख्या तापमान वाढलेल्या महिन्यातही त्यामुळे एक- दोन दिवसांचे पाणी वाचले. मार्च आणि एप्रिलमध्ये शेतीला पाणी देण्यात येत आहे. पाणीकपातीचे संकट असताना कुर्हाडे आणि त्यांच्या पथकाने योग्य नियोजन करत पाण्याचा काटकसरीने वापर केल्याने, पावसाळा येईपर्यंत तरी पाणी कपातीचे संकट येणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे. मेच्या अखेरीला आणि जूनच्या प्रारंभी ग्रामीण भागात पिण्यासाठी पुन्हा पाणी सोडावे लागणार आहे. त्यासाठी एक- दीड टीएमसी पाणी उपलब्ध राहील. त्या वेळी शेतीला पाणी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
कुर्हाडे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, त्या म्हणाल्या, धरणसाखळीत तीन टीएमसी पाणी कमी असतानाच आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर नियोजन केले. सर्वांना शेतीला पुरेसे पाणी मिळेल. तसेच, पुणे शहराला पाणीकपात करावी लागणार नाही, याची काळजी आम्ही आत्तापर्यंत घेतली आहे. पुणे शहराला 15 जुलैपर्यंत पाणी पुरेल इतके म्हणजे सुमारे सव्वासहा टीएमसी पाणी आरक्षित ठेवले आहे. सध्या ग्रामीण भागातून पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. कालव्यातून जमिनीत पाणी पाझरण्याचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागात पिण्यासाठी तलाव, विहिरी भरण्याची मागणी खूप आहे. आम्ही शक्य तेथे साह्य करत असताना पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. महापालिकेच्या मुंढवा प्रकल्पाद्वारेही जूनपर्यंत 1.3 टीएमसी पाणी घेण्याचे नियोजन केले आहे.
पाणीकपात, पुण्यात पुरेसा पुरवठा
राज्यात पाणीटंचाईचे संकट अनेक ठिकाणी आहे. मुंबईत 30 टक्के पाणी कपात लागू झाली. नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर या महानगरांत पाणी कपात सुरू झाली आहे. अशा काळात पुणे शहरात नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा अद्यापही सुरू आहे. उन्हाळी सुट्यांमध्ये पाणीटंचाई असलेल्या भागातून अनेक जण पुण्यात नातेवाइकांकडे राहण्यास येण्याची शक्यता आहे. त्यासाठी जादा पाणी लागणार असल्याने त्याचे नियोजनही करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता श्वेता कुर्हाडे यांनी सांगितले.
हेही वाचा