ऐतिहासिक लालमहाल चौकात तरुणाईचा जनसागर उसळला
ढोल-ताशा, बँड, वरळी बिट्सच्या पारंपरिक वाद्यांचा गजर
राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाने सात थर रचत फोडली हंडी
पुणे : ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, ढोल-ताशांचा मंगलमय गजर, महाकाल नृत्य आणि मुंबईतील प्रसिद्ध वरळी बिट्स यांच्या पारंपरिक संगीतावर थिरकणार्या तरुणाईचा उसळलेला जनसागर... अशा उत्साही वातावरणात पुनीत बालन ग्रुप आयोजित 26 सार्वजनिक मंडळांच्या संयुक्त अशा दहीहंडीचा थरार पुणेकरांनी अनुभवला. ऐतिहासिक लाल महाल चौकात तुडुंब गर्दीसमोर राधेकृष्ण ग्रुपने सात थर रचत ही संयुक्त दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळविला. (Pune Latest News)
महाराष्ट्रातील पहिली डीजेमुक्त दहीहंडी साजरी करीत एक नवा आदर्श यानिमित्त पुनीत बालन ग्रुपने मांडला. शहरातील 26 सार्वजनिक मंडळांनी एकत्र येऊन पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून संयुक्त दहीहंडी उत्सव सुरू केला आहे. यावर्षीची संयुक्त दहीहंडी डीजेमुक्त साजरी करण्याची घोषणा पुनीत बालन यांनी केली होती. त्यामुळे या डीजेमुक्त दहीहंडीला पुणेकर कसा प्रतिसाद देणार, याबाबत उत्सुकता होती. मात्र, ढोल-ताशांचा गजर आणि वरळी बिट्सने वाजविलेल्या संगीतावर हजारो पुणेकरांनी ठेका धरला आणि डीजेमुक्त दहीहंडीचा प्रयोग यशस्वी करीत एक नवीन पायंडा पाडला.
प्रभात बँडच्या सुमधुर वादनाने या दहीहंडी कार्यक्रमाची सुरुवात झाली. युवा वाद्य पथक, समर्थ पथक, रमणबाग आणि शिवमुद्रा या ढोल पथकांच्या जोरदार वादनाने या कार्यक्रमाची रंगत वाढवली आणि वरळी बिट्सच्या बँडने केलेल्या वादनाने अवघे वातावरण दंगून गेले. या वेळी अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता हार्दिक जोशी, मराठी बिग बॉसफेम ईरिना यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी या उत्सवाला हजेरी लावली.
या वेळी दहीहंडीच्या सलामीकरिता वंदे मातरम दहीहंडी संघ, नटराज संघ, म्हसोबा संघ, भोईराज संघ, गणेश मित्रमंडळ संघ, गणेश महिला गोविंदा पथक, गणेश तोफखाना दहीहंडी संघ, नवज्योत ग्रुप संघ, इंद्रेश्वर संघ (इंदापूर), शिवकन्या गोविंदा पथक (चेंबूर-मुंबई), शिवतेज ग्रुप, दहीहंडी संघ यांसारख्या अनेक गोविंदा पथकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. रात्री पावणेदहा वाजता राधेकृष्ण ग्रुपने सात थर रचत ही ऐतिहासिक दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. या वर्षीच्या दहीहंडी उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे उज्जैन येथील पारंपरिक ‘शिव महाकाल’ पथक होते. या पथकाच्या तालावर नाचत तरुणाईने जल्लोष केला.
नटीनं मारली मिठी... भांगात मोती भर काय... ज्याची होती त्यानंच नेली... आदी उडत्या चालीच्या गाण्यांवर तरुणाई बेभान होऊन नाचत होती. याखेरीज मच गोया शोर सारी नगरी रे... हर तरफ है ये शोर आया गोकुल का चोर..., गोविंदा रे गोपाळा... यशोदेच्या तान्ह्या बाळा, लाल लाल पागोटा गुलाबी शेला, हंडी फोडाया आला रे हा गोविंदा... या हिंदी-मराठी गाण्यांचा सर्वत्र बोलबाला होता. कोळीगीते, सैराटफेम झिंगाट आणि अंबाबाईच्या विविध आराध्यगीतांवर तरुणाईसह आबालवृद्ध आणि महिला थिरकताना दिसत होते.
शहर आणि उपनगरांतील मुख्य चौकांमध्ये आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दहीहंडी बांधून उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे सायंकाळनंतर शहराच्या बहुतांश भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दहीहंडी पाहायला आलेल्या नागरिकांनी रस्त्याच्या बाजूलाच आपली वाहने लावल्याने या वाहतूक कोंडीमध्ये भरच पडत गेली.
दरवर्षी दहीहंडीसाठी प्रमुख आकर्षण म्हणून मराठी-हिंदी अभिनेता, अभिनेत्री तसेच रील्स स्टारना बोलाविण्यात येते. विशेषत: उपनगरांमध्ये सेलिबि—टींना मोठी रक्कम मोजून आमंत्रित केले जाते. यंदाही तोच ट्रेंड दहीहंडीमध्ये दिसून आला. यामध्ये रील्स स्टार आणि मराठी मालिकां मधील कलाकारांना पाहुणे म्हणून बोलावण्याचे प्रमाण जास्त राहिले. याखेरीज बहुतांश मंडळांनी खेळ पैठणीच्या कार्यक्रमांचेही आयोजन केले.
वाहतूक सुरळीत सुरू राहावी, कायद्याचे पालन करून दहीहंडी उत्सव साजरा व्हावा, यासाठी पोलिसांसह स्वयंसेवकांची मोठी फौज कार्यरत होती. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून संशयित व्यक्ती आणि वस्तूंची कसून तपासणी करण्यात येत होती. दहीहंडी पाहण्यास येणार्या गोविंदाभक्तांना, दहीहंडी फोडणार्या गोविंदांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी आयोजकांकडूनही प्रयत्न करण्यात येत होते.
पुणेकरांनी डीजेमुक्त दहीहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा उत्सव यशस्वी केल्याबदल मी मनापासून आभार व्यक्त करतो. गतवर्षी आम्ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी सार्वजनिक मंडळांचा संयुक्त दहीहंडी उत्सव सुरू केला होता. यंदाच्या वर्षी डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प केला असून, त्याच भूमिकेतून दहीहंडीमध्ये डीजेचा वापर टाळण्यात आला. त्यामुळे ध्वनिप्रदूषण कमी झाले आणि पारंपरिक वाद्यवादकांनाही रोजगार मिळाला.- पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप/विश्वस्त, उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट