पुणे : पुणे जिल्हा परिषद भरती प्रक्रियेला मुहूर्त मिळाला असून, गट 'क' सवंर्गातील 21 पदांच्या एक हजार जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी आजपासून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक खुली होत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी यापूर्वी 2019 मध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, ही भरती प्रक्रिया मध्येच स्थगित करण्यात आली. त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी होती.
त्यानंतर प्रत्यक्षात पुन्हा एकदा भरती प्रक्रिया सुरू होत असल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयबीपीएस या खासगी यंत्रणेद्वारे ही सर्व प्रक्रिया होत आहे. अर्ज करण्यासाठी 5 ते 25 ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज पुणे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर करावा लागणार आहे. एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून अर्ज करू नये. वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्रपणे अर्जाची मुभा आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1 हजार, तर आरक्षित उमेदवारांसाठी 900 रुपये अर्ज शुल्क आहे. अर्जासाठी लिंक : https: ibpsonline.ibps.in/ zpvpiun23/
विविध पदांसाठी 2019 मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी 60 हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे अर्जासोबत भरलेली शुल्काची रक्कम उमेदवारांना परत केली जाणार आहे. एवढेच नव्हे, तर या सर्व उमेदवारांना वयामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, या उमेदवारांनी आताच्या परीक्षेसाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे.
हेही वाचा