Pune Jilha Parishad Pudhari
पुणे

Pune Jilha Parishad President Election: पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे; उपाध्यक्षपदी वळसे पाटील बिनविरोध

पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची बिनविरोध निवड; विरोधकांनी अर्ज माघारी घेतले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुक्यातील ज्येष्ठ सदस्य वीरधवल जगदाळे, तर आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते ॲड. विजयसिंह शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विवेक वळसे पाटील, तर शिवसेना (शिंदे गट)चे मंगेश काकडे यांनी अर्ज दाखल केला. दुपारी तीन वाजता झालेल्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजाच्या सुरुवातीपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

त्यानंतर दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली असून सर्व अर्ज वैध ठरले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती देत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी जाहीर केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच शिवसेना (शिंदे गट) सदस्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर विरोधी पक्षाचे विजयसिंह शिंदे आणि मंगेश काकडे यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यानंतर अध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्षपदासाठी विवेक वळसे पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT