पुणे

पुणे : पक्ष फुटीमुळे जि.प. गटांमध्ये राजकीय गुंता

अमृता चौगुले

नरेंद्र साठे

पुणे : अगोदर शिवसेनेत त्यानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत कोणत्या गटाकडून निवडणूक लढवावी, असा प्रश्न इच्छुकांमध्ये निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने झालेल्या फलकबाजीमध्ये अनेक माजी सदस्य आघाडीवर होते,तर तेच खासगीत साहेब आमचे दैवत आहेत, असे सांगत असल्याने येणार्‍या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांच्या इच्छुकांपुढे राजकीय गुंता वाढणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे. आगामी निवडणुकीत ही अशीच परिस्थिती राहील असे वाटत असतानाच, राज्यातील सत्ता नाट्यात अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याने येणार्‍या निवडणुकीत काय होणार याकडे लक्ष लागले आहे. गत पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 43 सदस्य निवडून आले होते.

यातील बहुतांश माजी जिल्हा परिषद सदस्य अजित पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर सांगत असले तरी, खासगीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच सोबत असल्याचे सांगतात. एक वर्षापूर्वी शिवसेनेतही दोन गट पडले असून, त्यातही माजी सदस्य दोन्ही गटांत विखुरले गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद दोन गटांत विभागली गेल्याने सदस्य संख्येवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेवर सत्तेत येण्यासाठी भाजपने राज्यात सत्तेत आल्यापासूनच आपल्या कार्यकर्त्यांना निधीचे बळ दिले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीचे निधी वितरित करताना, तत्कालीन महाविकास आघाडी सरकाराने मंजूर केलेली अनेक कामे बदलली. नव्याने कामे मंजूर करताना भाजपच्या कार्यकर्त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेत कामे वाटप केली. यामुळे ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उमेदवारीवरून रस्सीखेच

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शिवसेना पक्षाची तालुका तालुक्यात आपापली स्वतःच्या कार्यकर्त्यांची फळी आहे. मात्र, राज्यातील सत्तांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र आल्याने कुणाला कुठे उमेदवारी द्यावी यावरून रस्सीखेच निर्माण होणार आहे, तसेच या युतीमुळे मोठ्या प्रमाणावर गटबाजी, उमेदवारी नाकारलेले प्रबळ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) या पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे.

त्यांची पुन्हा घरवापसी?

शिवसेनेत दोन गट पडल्याने पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिंदे गटात सहभागी झाले. मात्र, यातील काही सदस्यांचे मन शिंदे गटात रमत नसल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे माजी सदस्य पुन्हा कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या गटात घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी काँग्रेस : 43
काँग्रेस : 7
शिवसेना : 14
भाजप : 7
लोकशाही क्रांती : 1
रासप : 1
अपक्ष : 2

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT