पुणे

पुणे: झेडपी घिवशी शाळेप्रकरणी अधिकार्‍यांना पाठवणार नोटीस

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन शाळांसाठी तीन शिक्षक आणि दोन्हीही विद्यार्थी एकाच गावचे असल्याचे शिक्षणाधिकार्‍यांच्या भेटीमध्ये समोर आले. ही बाब संबंधित केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकार्‍यांना माहिती असणे साहजिकच आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधित केंद्रप्रमुख व विस्तार अधिकार्‍यांना नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.

वेल्हे तालुक्यात दोन प्राथमिक शाळेत प्रत्येकी एक-एक विद्यार्थी, या दोन शाळांसाठी तीन शिक्षक आणि दोन्हीही विद्यार्थी एकाच गावचे असल्याचे शिक्षणाधिकार्‍यांच्या भेटीमध्ये समोर आले. एकाच गावातील रहिवासी असलेले दोन विद्यार्थ्यांपकी एक विद्यार्थी गावच्या शाळेत, तर दुसरा विद्यार्थी पाच किलोमीटर असलेल्या शाळेत शिक्षण घेत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पटसंख्येची सद्यस्थिती दिसून येत आहे.

वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम पानशेत खोर्‍यातील आंबेगाव आणि घिवशी येथील प्राथमिक शाळेतील हा प्रकार समोर आला आहे. आंबेगाव येथील प्राथमिक शाळेत एक, तर पाच किलोमीटर अंतरावर घिवशी येथील शाळेत एक विद्यार्थी पटसंख्या आहे. दोन्ही विद्यार्थी एकाच गावचे आहेत. मात्र एक विद्यार्थी त्यांच्या गावातील शाळेत, तर दुसरा घिवशी येथील शाळेत शिकत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पानशेत खोर्‍यातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांना अचानक भेटी दिल्या. त्यामध्ये शाळा सुरू ठेवण्यासाठी शिक्षकांनी केलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आली.

कारवाई कोणत्या नियमानुसार होणार?

शिक्षण विभागाच्या नियमानुसार एक विद्यार्थी शाळेत असला तरी दोन शिक्षक असणे आवश्यक आहे. त्याच नियमाचा आधार घेतल्यास आंबेगाव बुद्रुक व घिवशी येथील शाळांत प्रत्येक एक विद्यार्थी आहेत. त्यामुळे कोणत्या नियमानुसार कारवाई करावी, असा प्रश्न शिक्षण विभागापुढे निर्माण झाला आहे.

SCROLL FOR NEXT