पुणे: सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे यवत शहरात शुक्रवारी (दि.१) तणावाची ठिणगी पडली. या घटनेचे पडसाद म्हणून संतप्त जमावाने काही ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड केली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातारण निर्माण झाले आहे.
एका ताज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीमुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज (दि.१) जवळच्या वरवंड गावात होणाऱ्या नियोजित सभेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
शुक्रवारी सकाळी यवतमधील सहकार नगर भागात राहणाऱ्या एका मुस्लिम युवकाने सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरताच, स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर दुपारच्या सुमारास तणाव वाढला आणि त्याचे रूपांतर हिंसक घटनांमध्ये झाले. संतप्त जमावाने परिसरातील काही दुचाकी पेटवून दिल्या. याव्यतिरिक्त, एका मशिदीची देखील तोडफोड करण्यात आल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. ज्या युवकाने ही पोस्ट केली होती, त्याच्या सहकार नगरातील घराला लक्ष्य करत काही कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी, यवत आणि आसपासच्या परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण कायम आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आणि वाढता तणाव पाहता यवतमधील आठवडे बाजार तातडीने बंद केला.
शुक्रवारची घटना ही एका घटनेच्या स्वरूपात पाहिली जात नाही. अवघ्या काही आठवड्यांपूर्वी, २६ जुलै रोजी, यवतमधील नीलकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे नागरिकांच्या भावना तीव्र होत्या. त्या घटनेच्या जखमा ताज्या असतानाच या नव्या प्रकरणामुळे लोकांचा संयम सुटला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर, यवतपासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या वरवंड गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज एक मोठी सभा आणि जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. माजी आमदार रमेश थोरात यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश हा या सभेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, यवतमधील गंभीर परिस्थिती पाहता, पोलीस प्रशासन एवढ्या मोठ्या सभेला परवानगी देणार का? आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार अशा संवेदनशील वातावरणात सभा घेण्याचा निर्णय घेतील का? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनासमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान असून, या सभेबाबतचा अंतिम निर्णय परिसरातील शांततेसाठी निर्णायक ठरू शकतो.